👁 6 Views

युवकावर गोळी झाडून बाप – लेक पोलिस ठाण्यात

 

नांदेड – जुन्या वादातून शुक्रवारी दिवसाढवळ्या नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडली.

जुना मोंढा भागातील खंडेलवाल स्विट मार्टसमोर उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळी झाडल्यानंतर आरोपी बाप अन् अल्पवयीन मुलगा स्वत:हून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतूसे जप्त केली आहेत.वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.


नांदेडला गोळीबाराची घटना तशी नवी नाही. गावठी पिस्टल सापडण्याचे प्रमाणही अधिक आहे. जानेवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ता सविता गायकवाड हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने स्वतवर गोळी झाडून दोघांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नांदेडात गोळीबाराची घटना घडली नव्हती. उलट पोलिसांनी अनेकांकडून गावठी पिस्टल जप्त केले होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वर्दळीच्या असलेल्या जुना मोंढा परिसरात गोळीबार झाला. सचिन कुलथे रा.गाडीपूरा हा तरुण खंडेलवाल स्विट मार्ट समोर उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या गजानन बालाजी मामीलवाड याने त्यांच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी कुलथे यांच्या दंडातून आरपार गेली. त्यामुळे ते जागेवर कोसळले.


यावेळी आरोपी मामीलवाड याने सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले होते. त्यानंतर आरोपी बाप-लेक स्वताहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून जखमी कुलथे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपी मामीलवाड याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, जखमी सचिन कुलथे आणि आरोपी गजानन मामीलवाड यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडली.


दोघांनी केला होता तलवारीने एकमेकांवर हल्ला
काही वर्षापूर्वी पैशाच्या देवाण-घेवाणीतून सचिन कुलथे आणि गजानन मामीलवाड यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर तलवारीने हल्ला केला होता. या प्रकरणात इतवारा ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यातच काही दिवसापूर्वी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्यानंतर मामीलवाड याने कुलथे याच्यावर गोळीबार केला.

अल्पवयीन मुलालाही अडकविले
गजानन मामीलवाड याने कुलथेवर गोळीबार करण्यासाठी सोबत दोन गावठी पिस्टल आणि पाच राऊंड घेतले होते. तसेच दुचाकीवर सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले. कुलथे यांच्यावर त्यातील एक गोळी झाडली. परंतु या प्रकरणात आपल्या अल्पवयीन मुलालाही अडकविले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *