👁 11 Views

भूवैकुंठ पंढरपूर येथे चंद्रभागेतीरी स्वच्छता अभियान राबवून साजरा झाला प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांचा वाढदिवस!

पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019

                       
अध्यात्मातून साकारला पर्यावरण संरक्षणाचा आदर्श!  -डॉ. एस. एन. पठाण (माजी कुलगुरु)
 ‘तीर्थक्षेत्र ही ज्ञानतीर्थ क्षेत्र’ झाली पाहिजे या संकल्पनेचे उद्गाते प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांचा ७८वा वाढदिवस दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी नुकताच साजरा झाला.  
ह. भ. प. बाळासाहेब गंगारामजी मोहिते पाटील यांच्या प्रेरणेमुळे दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी परभणी येथील २०० महिला व पुरुष वारकर्‍यांनी चंद्रभागा नदीची स्वच्छता करून अध्यात्मतेचा एक नवीन पैलू दर्शविला व प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा केला, त्याचा वृत्तांत डॉ. एस. एन. पठाण यांच्या लेखणीतून…….                     
मोठ्या माणसाचा वाढदिवस म्हटलं की वर्तमानपत्रातील पानभर जाहिराती, मोठे मोठे बॅनर व त्यावरचे भव्य फोटो, देखणा विशाल मंडप व मग हजारो कार्यकर्त्यांची शुभेच्छांसाठी गर्दी व नंतर उठलेल्या जेवणावळी, ही शक्यतो मोठ्या माणसाचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत ठरली आहे. अर्थात अनेक लोक याला अपवाद असू शकतात. अशाच प्रकारचा अपवाद सतत जाणवतो तो विश्‍वधर्मी, विश्‍वशांतीदूत व शिक्षणमहर्षी डॉ. विश्‍वनाथ कराड यांचे बाबतीत. दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचा ७८ वा वाढदिवस एम.आय.टी. कोथरूडच्या प्रांगणात साजरा झाला. या वाढदिवसाचे निमंत्रण एकाही व्यक्तिला दिलेले नसते परंतु त्यांचे शेकडो चाहते स्वतःहून येतात. अलिंगन देतात, हस्तांदोलन करतात व त्यांच्या वैयक्तिक प्रेमापोटी सरांना पुष्पगुच्छाबरोबर कधी कधी फेटा बांधतात, कधी कधी शाल अंगावर टाकून सरांचा सत्कार करतात. विशेष म्हणजे हा सर्व समारंभ अत्यंत शांतपणे चालू असतो. येणार्‍या मित्रांमध्ये सर्व धर्मियांचा समावेश असतो हे विशेष आणि म्हणूनच त्यांना लोकांनी दिलेले ‘विश्‍वधर्मी’ हे नाव अत्यंत सार्थ ठरते. 
प्राध्यापक ते संस्थाचालक
प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी आपल्या कष्टातून एम.आय.टी. ही शिक्षणसंस्था विकसीत केली. शासकिय महाविद्यालय, पुणे (उजएझ) येथे एक प्राध्यापक असणारे डॉ. विश्‍वनाथ कराड लहानपणापासूनच विशाल दृष्टी असणारे स्वप्नाळू वृत्तीचे होते. शालेय विद्यार्थी असतानाच ते सर्व जगासाठी ग्रामदैवत संत गोपाळबुवा महाराजांकडे साकडे घालत व ईश्‍वराची प्रार्थना करत. वारकरी घराण्याचा वारसा. वयाच्या ५व्या वर्षीच आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या भगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का यांची लाभलेली माऊलींची सावली व रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर या अत्यंत छोट्या खेड्यातून आल्यामुळे उपजतच मिळालेला कणखरपणा व त्याला लाभलेली बुद्धीमत्तेची झालर यामुळे डॉ. कराड सरांनी एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. 

महाराष्ट्रात अनेक इंजिनिअरिंग महाविद्यालये असावी अशी कल्पना त्यांनी मांडली व कै. वसंतदादा पाटील (तत्कालीन मुख्यमंत्री) यांनी ती मागणी उचलून धरली व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून विनाअनुदानाचे युग अवतरले. प्रा. डॉ. कराड सरांनीही १९८३ साली इंजिनिअरिंग महाविद्यालय कोथरूड, पुणे येथे सुरू केले व एका प्राध्यापकापासून ते एकदम संस्थाचालक झाले. 
विश्‍वशांती केंद्राची स्थापना
प्राध्यापक डॉ. विश्‍वनाथ कराड आजही प्राध्यापक म्हणूनच कार्य करतात. सतत प्राध्यापकांना व मुलांना मार्गदर्शन करतात. इंद्रायणीतीरी आळंदी येथे भक्कम दगडी घाट बांधण्याचे कार्य त्यांनी सुरू केले व तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्‍वर माऊली व तत्त्वज्ञ संत तुकाराम महाराज हे त्यांचे श्रद्धास्थान राहिले. त्यातूनच १९९६ साली त्यांनी विश्‍वशांती केंद्राचे स्थापना केली व युनेस्को पॅरीस या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या कार्याची नोंद घेऊन १९९८ साली त्यांना “विश्‍वशांतीचा प्रसार करण्यासाठी अध्यासन” बहाल केले. दक्षिण पूर्व आशिया खंडात ते एकमेव विश्‍वशांतीचे अध्यासन असणारे ते मानकरी ठरले. 
विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय
प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या जीवनावर भारताचे महान सुपूत्र स्वामी विवेकानंद यांचा विशेष पगडा असल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व शिक्षण संस्थात विज्ञान आणि अध्यात्म या संकल्पनेवर अधिक भर दिला व त्या माध्यमातून विश्‍वशांतीचे कार्य सुरू केले आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पसायदानाप्रमाणे त्यांची दृष्टीही विशाल झाली व ते खर्‍या अर्थाने ‘विश्‍वधर्मी’ झाले. 

मानवतेचा ध्यास
त्यातूनच त्यांच्या गावात रामेश्‍वर (रुई) येथे उभे राहिले श्रीराम मंदीर, ह. जैनुद्दीन चिश्तींचा दर्गा, जामा मशिदीचे नुतनीकरण, श्रीराम-रहीम मानवता सेतू व तथागत् गौतम बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीकेंद्र. त्यांच्या प्रत्येक महाविद्यालयाला मंदीराचे स्वरुप येऊ लागले व त्यातूनच उभी राहिली एकूण  ४ विद्यापीठे व जगातील सर्वात मोठा गोल घुमट. हा घुमट म्हणजे मानवता व भारतमातेला अर्पण केलेले ‘विश्‍वशांती प्रार्थना सभागृह’ आहे व त्याद्वारे अखिल मानवतेसाठी काम करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. 
इंद्रायणी व चंद्रभागेची आरती
आपल्या नद्या ह्या आपल्या माता असून त्या स्वच्छ राहिल्या पाहिजे व तीर्थक्षेत्री असणार्‍या नदीमध्ये स्नान केल्याने पाप क्षालन होते यावर लोकांची श्रद्धा असल्यामुळे या नद्या स्वच्छ ठेवल्या तरच त्या पवित्र राहतील या भावनेतून प्रा. डॉ. कराड यांनी इंद्रायणीतीरी आळंदी येथे व चंद्रभागेतीरी भूवैकुंठी पंढरपूर येथे नदीची आरती सुरू केली. या आरतीच्या उपक्रमाचा भाविकांवर फारच सकारात्मक प्रभाव पडला व त्यातूनच महाराष्ट्र शासनाचा ‘नमामी चंद्रभागा’ किंवा परभणीकरांनी स्वयंप्रेरणेतून साकारलेला हा पर्यावरण संरक्षणाचा कार्यक्रम. 
अभिनव पद्धतीने वाढदिवस
गुरुवर्य श्री. बाबासाहेब महाराज पोळ यांच्या आशीर्वादाने व श्री. प्रकाश महाराज बोधले यांच्या प्रेरणेने प्रा. डॉ. कराड सरांच्या ७८व्या जन्मदिनी म्हणजे दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी ह. भ. प. बाळासाहेब गंगारामजी मोहिते पाटील व मातोश्री चंद्रभागा गंगारामजी मोहिते पाटील यांनी स्वयंप्रेरणेतून भूवैकुंठी पंढरपूरी चंद्रभागा माता अस्वच्छ कशी असू शकते हा विचार मांडला व त्यातूनच अध्यात्माच्या जोरावर २०० भावीक प्रेरीत झाले. प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या जन्मदिनी दि. ३ फेब्रुवारी रोजी व श्री. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हेस र्व भाविक नदीमाता चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी आले आणि त्यातून साकारला पर्यावरण संरक्षणाचा आदर्श. 

अध्यात्मातून स्वच्छता अभियान
अध्यात्मिक प्रेरणेतून वारकरी मंडळी विशेषताः महिला कामाला लागल्या. विविध प्रकारची वाहनं व बसेस मधून २०० वारकर्‍यांचा लोंढा शनिवार, दि. २ फेब्रुवारी रोजी रात्रीच पंढरपूरला दाखल झाला. हातामध्ये विश्‍वशांतीदूत डॉ. कराड यांचे बॅनर दाखवीत सर्व वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला आतूर झाले होते. चंद्रभागेतीरी जावून नदीतील केरकचरा प्रत्येकाने उचलायला सुरुवात केली. महिला त्यात अग्रेसर होत्या. टाळ-मृदुंगाचा गजर होताच व म्हणता-म्हणता कित्येक टन कचरा गोळा झाला. ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी झाले याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. 
श्री. दत्तात्रय बडवे यांचे योगदान
प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या कार्याने भारावून गेलेले हे सर्व वारकरी विशेषतः मोठ्या प्रमाणात परभणीहून आलेल्या महिला, बाल किर्तनकार यांनी संपूर्ण पंढरपूर मधून श्री. दत्तात्रय बडवे यांच्या नेतृत्वाखाली विश्‍वशांतीदूत डॉ. कराड यांचा जयजयकार करत मिरवणूक काढली व प्रा. डॉ. कराड यांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने वसा घेतला. टाळ-मृदुंग गजर, हातात झाडू, कचर्‍याचे ढीग व त्यामागे पांडुरंगाची प्रेरणा व विश्‍वशांतीदूताबद्दलचा आदर या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे अध्यात्मातून साकारले पर्यावरण संरक्षण असेच म्हणावे लागेल अशाच प्रकारे प्रत्येक मोठ्या माणसाने विशेषतः राजकीय पक्षाच्या पुढार्‍यानेदेखील आपला वाढदिवस भूवैकुंठी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीमाता स्वच्छ करुन साजरा केल्यास अत्यंत महत्त्वाचा ‘पर्यावरण संरक्षणाचा’ संदेश आपण जनतेला देऊ शकतो, अर्थात हे फक्त अध्यात्मिक प्रवृत्तीने व अध्यात्मानेच शक्य होणार आहे, हे मात्र खरे.  

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *