पंढरपूर (प्रतिनिधी):- सर्वांनी आपल्या जीवनात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आचरण करावे. जयंती उत्सव साजरे करताना हे विचार अबालवृध्दांपासून सर्वांच्या मनात रुजणे आवश्यक असल्याचे मत इतिहास संशोधक व अभ्यासक गोपाळराव (नाना) देशमुख यांनी व्यक्त केले. ते आज पंढरपूर मधील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ.रत्नप्रभा चांगदेव पाटील यांचे परिवाराच्या वतीने समता नगरमधील त्यांचे निवासस्थानी आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपतींच्या राज्यात शिवरायांचा सैनिकांना आदेश होता की, शेतकर्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावता कामा नये; परंतु आज आपण पहातो शेतकर्यांचा ऊस वाहुन नेणार्या बैलगाडीतून अनेकजण राजरोसपणे ऊस हिसकाऊन घेताना आढळतात. प्रत्येकाने स्वत:पासुन शिवरायांच्या विचारांचे आचरण करण्यास प्रारंभ केला तर तीच खरी शिवजयंती होय. आज छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन अनेकजण आपला स्वार्थ साधताना आढळतात हे चित्रं कुठं तरी थांबायला हवं.
यावेळी उपस्थित असलेले पुणे येथील शिवतंत्रकार शिवविचारवंत दत्ताभाऊ सोनवणे यांनी ही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, गणेशोत्सव घरातून साजरा होत असे तो आज सार्वजनिक स्वरुपात साजरा होताना आढळतो. शिवजयंती चा प्रारंभ सार्वजनिक स्वरुपात झाला होता मात्र तो आज खर्या अर्थाने घरातून सुरु झाल्याचे समाधान वाटले. आज या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमेसमोर प्रज्वलीत झालेली ज्योत घराघरात प्रज्वलीत होईल. यापुढे सार्वजनिक होत असलेली शिवजयंती प्रत्येक घराघरातून साजरी होईल. आजचा हा क्षण ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल. कारण पाटील कुटूंबियांनी आपल्या घरातून साजरी केलेली ही शिवजयंती प्रत्येकास प्रेरणा देत राहील.
यावेळी शिवप्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच उपस्थित मान्यवरांना शिवप्रतिमा देण्यात आली. यावेळी छावा युवक संघटनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष सागर कदम, साहित्यीक रवि सोनार, प्राचार्य शिवाजीराव बागल, कवी सचिन कुलकर्णी, कवी राजेंद्र भोसले, उद्योगपती उन्मेष बागल, पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे, उपाध्यक्ष राजेंद्र कोरके, पत्रकार नंदकुमार देशपांडे, आदींसह अनेक महिला भगिणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान वानखेडे यांनी केले. तर आभार पल्लवी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी वल्लभ पाटील व पाटील परिवारातील हितचिंतकांनी परिश्रम घेतले.
Posted inPandharpur Live News

