देवराष्ट्रे
– देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यातील चारा
पाण्याअभावी वाळून गेला. यामुळे चाऱ्याच्या शोधासाठी फिरणारी हरणे भटक्या
कुत्र्यांची शिकार होण्याची शक्यता आहे. अभयराण्यातील ओढ्या ओघळीत तसेच
बंधाऱ्यामध्ये पाणी उपलब्ध असतानाही या पाण्याचा वापर करून वनविभागाने
पुरेसा चारा निर्मिती केली नाही. यामुळे चाऱ्याच्या शोधात हरणे
अभयारण्याबाहेर पडत आहेत.
देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य
म्हणून ओळख असलेले हे अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या अभयारण्यात
हरीण, काळविट, सांबर, चितळ आदी वन्यजीव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
परंतु, आता अभयारण्यातील हरणे अभयारण्याबाहेर पडत आहेत. बाहेर पडलेली
हरणे, शेतकऱ्यांची पिके फस्त करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या
प्रमाणावर नुकसान होत आहे.
वन विभागाने हरणासाठी चारा निर्मितीचे
अनेक प्रकल्प हाती घेतले होते. ताकारी योजनेचे पाणी अभयारण्यातील हरणासाठी
बारमाही ओला चारा निर्माण करण्यात वनविभागाला यश आले नाही. यामुळे पर्यटक
तसेच देवराष्ट्रे परिसरातील ग्रामस्थांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्य विकासासाठी कोट्यवधीचा निधी
दिला असून स्वागत कमान, बांबू कुटी, विश्रामगृह निरीक्षण मनोरा, बंधारे आदी
विकास कामे झाली. चारा निर्मितीसाठीही निधीची तरतूद आहे.
परंतु,
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चारा निर्मिती पुरेसी झाली नाही. उपलब्ध
पाण्याचा वापर करून सुरक्षित भागामध्ये हरणासाठी भरपूर चारा उपलब्ध
करण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पर्यटक तसेच परिसरातील
नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मका आणि झाडपाल्यावर भिस्त
वनविभागाने
हरणांसाठी ओल्या गवताचा चारा उपलब्ध नसल्यामुळे १० एकर क्षेत्रात मका
लावला आहे. हा मका कापून हरणांना घातला जातो. परंतु, मोकाट हरणे पाळीव
प्राण्याप्रमाणे मकाचा चारा खाण्यासाठी येणे अशक्य आहे. कित्येक हरणे
पालवी फुटलेल्या झुडपालाही खात आहेत. परंतु, त्यांच्या आवडीचा ओल्या गवताचा
चारा उपलब्ध नाही.
