![]()
कारण तेव्हा ‘प्लास्टिक सर्जरी’ विकसित होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी
सांगतात. तंत्रज्ञानातील पुरातन प्रगतीचे उदाहरण म्हणून महाभारतातील पुष्पक
विमानाचा दाखला देतात. ‘गणपती दूध पितो…हे त्या काळच्या सत्ताधाऱ्यांनीच
जाहीरपणे सांगितले होते. देशात अशी अविवेकी स्थिती कधीच नव्हती. खरे तर
त्याची चिरफाड होणे गरजेचे आहे. पण ते सोडून माध्यमांकडून त्याचे
उदात्तीकरणच सुरू आहे. देशासाठी ही गोष्ट घातक आहे. असे परखड मत ज्येष्ठ
पत्रकार पी. साईनाथ यांनी आज येथे मांडले.
येथील डेक्कन हॉलमध्ये
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित
दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाची सांगता साईनाथ यांच्या
प्रमुख उपस्थितीत झाली. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील
अध्यक्षस्थानी होते. संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत
डॉ. सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष ॲड. के. डी. शिंदे, अंनिसचे
कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, संपादक प्र. रा. आर्डे, सुशीला
मुंडे यांच्यासह मान्यवर विचारवंत मंचावर उपस्थित होते.
अंधश्रद्धेला
खतपाणी घालणारे सरकारी धोरण, अविवेक आणि असहिष्णूता वाढीस लागणारी विधाने
करणारे नेते आणि त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत नको त्या विषयांचा
उदोउदो करणारी माध्यमे यावर हल्लाबोल करत श्री. साईनाथ यांनी विदारक वास्तव
मांडले. ते म्हणाले, ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ.
कलबुर्गी या तीन विचारवंतांच्या हत्या झाल्या. माध्यमांनी त्याच्या
मुळापर्यंत जायला हवे. इथे शोधपत्रकारिता दिसायला हवी होती. कार्पोरेट
जगताच्या प्रभावाने विवेकवादाची अपेक्षा फोल ठरते. सत्ता चालवणारी मंडळी
अविवेकाचा प्रचार करताहेत, अंधश्रद्धा पसरवत आहेत. मूर्खपणाची विधाने करत
आहेत. ती खोडून काढण्याची जबाबदारी या माध्यमांनीच घ्यायला हवी. एकीकडे
भूकबळी जात असताना आम्ही गणपती दूध पितो, याच्या बातम्यांना किती प्राधान्य
द्यायचे? इथेच थांबलो नाही तर कुणाचा गणपती जास्त दूध पितो, अशी स्पर्धा
चालवली जाईल. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटसाठी पाण्याची प्रचंड नासाडी होत
असताना त्याविरुद्ध माध्यमे बोलत नाहीत. तो विषय बाजूला राहतो आणि उसाला
पाणी देऊन नासाडी करत नाही का, हा मुद्दा चर्चेला येतो. नाशिकच्या
कुंभमेळ्याला १.३ टीएमसी पाणी दिल्याने तिथल्या द्राक्ष बागांचे हालहाल
झाले.
मराठवाड्यातील बिअर कारखान्यांना ४ पैसे लिटरने पाणी दिले
गेले. फन अँड फूड पार्कसारख्या पैसे कमाऊ धंद्यात पाण्याची नासाडी होते.
तिकडे पाहण्याचा विवेक माध्यमांनी जपला पाहिजे.’’
ते म्हणाले,
‘‘सध्याचे सरकार शहरीबाबूंचे आहे. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांची
जाण नाही. ही मंडळी ज्यांचे पाय धरतात ते म्हणतात साईबाबांमुळे दुष्काळ
पडलाय. त्याचवेळी विद्यापीठांच्या माध्यमातून अविवेकी शिक्षण देणाऱ्या,
प्रतिगामी विचार रुजवणाऱ्या विभागांची निर्मिती केली जातेय. अशावेळी
अंनिसची जबाबदारी आणखी वाढते. त्यांच्या वार्तापत्राकडून या चिरफाडीची
अपेक्षा वाढते.’’
डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘‘अंधश्रद्धेला अनुकूल
असे राज्यकर्ते सत्तेवर आले आहेत. गणपतीच्या निर्मितीवरून प्लास्टिक
सर्जरीचा शोध लावणाऱ्या पंतप्रधानांसमोर काय डोके बडवून घ्यायचे? निराश न
होता आपणास लढावे लागेल. अविवेकी, असहिष्णू वातावरणात विवेकाचा पायबंद
घालणाऱ्या शक्ती आपण उभारल्या पाहिजेत. नव्या पिढीकडे ती धमक आहे, हेच या
संमेलनातून दिसून आले. या देशात लोकसंसदेची सत्ता चालणार आहे की मूठभर
धर्मांध, सनातन्यांची हे स्पष्ट नाही. कारण धर्मनिरपेक्षता मोडण्याचा एक
डाव टाकला गेला आहे. त्याला तिलांजली दिली जातेय. आम्हाला पंथनिरपेक्षता
चालते, असे सांगणारे विवेकाचा पर्याय निवडायला तयार नाहीत. ही वाटचाल
विनाशाकडे जाणारी आहे. ज्यांनी परिवर्तन घडवायला हवे ते प्राध्यापक
प्रमोशनसाठी सत्यनारायण पूजा घालतात. त्यांना फटके दिले पाहिजेत.’’
डॉ.
लवटे म्हणाले, ‘‘गेली पंचवीस वर्षे वार्तापत्राने प्रबोधनाचे काम केले,
आता कृतिशील कार्यक्रमाची गरज आहे. विज्ञानवादी विचारांची कितीही पेरणी
केली तरी जाती-धर्माचे स्तोम वाढते आहे. शिक्षणातून वैज्ञानिक विचार रुजत
नाही तोवर हे आव्हान कायम आहे.’’
मुक्ता दाभालकर यांनी दोन दिवसांचा
आढावा घेत डॉ. दाभोलकर यांच्या पश्चात ही चळवळ नेटाने पुढे जात असल्याचे
समाधान व्यक्त केले. कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी भविष्यातील लढ्याला
या संमेलनाने बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रा. बाबूराव गुरव, डॉ.
विजयम् गोरा, हमीद दाभोलकर, राहुल थोरात आदी प्रमुख उपस्थित होते.
अंधश्रद्धाळू पंतप्रधान देशाला फारच घातक
पी.
साईनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लंडन दौऱ्यातील व्यासपीठावर
देवीदेवतांची छायाचित्रे झळकल्याचा संदर्भ देत टीकेची झोड उठवली. ते
म्हणाले, ‘‘स्वतः भगवान व्हायला निघालेले पंतप्रधान जग फिरून आले. लंडन
दौऱ्यात जे झाले, ते देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. त्याची लाज
वाटते.’’ डॉ. एन. डी. पाटील यांनीही मोदी यांचा उल्लेख आत्मसंतुष्ट नेता,
असा करताना अंधश्रद्धाळू पंतप्रधान देशाला घातक असल्याची टीका केली.
भेकड नेत्यांमुळे तीन रत्ने गमावली
डॉ.
एन. डी. पाटील म्हणाले, ‘‘भेकड राज्यकर्त्यांमुळे आमची तीन रत्ने गमवावी
लागली. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या खुन्यांचा तपास
लागत नाही, हे धक्कादायक आहे. आपल्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड
पोलिसांशी व्हायची. आजही त्यांच्यात ती क्षमता आहे, मात्र राज्यकर्त्यांची
इच्छाशक्ती नाही.’’ साधूंना सात खून माफ असतात, आता तीन झालेत, असा उपरोधिक
टोलाही त्यांनी हाणला.
संमेलनात ठळक
* कार्टून, रांगोळी प्रदर्शनाला प्रतिसाद
* सांगता समारंभापूर्वी मांडला हिशेब
* जमा ६.६६ लाख, खर्च ८.२५ लाख
* पुस्तकांच्या खरेदीला उदंड प्रतिसाद
संमेलनाचे ठराव
डॉ.
नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना
शोधण्यात अपयश आलेल्या तपास यंत्रणा, प्रशासन आणि शासनाचा निषेध.
मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून शासन करावे.
जात पंचायतीला मूठमाती देण्याच्या अंनिसच्या प्रयत्नांची दखल घेत सामाजिक बहिष्काराविरुद्ध राज्य शासनाने कायदा केल्याबद्दल अभिनंदन.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारे आणि त्याचे समर्थन करत निष्क्रियता दाखवणाऱ्या शासनाचा निषेध.
