पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर मधील नावाजलेल्या स्वेरी या गोपाळपूरमधील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने मुलींच्या वस्तीगृहातील आपल्याच रुममध्ये सकाळी सव्वा नऊ वाजता छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना या महाविद्यालयाच्या एकुणच सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कोणतीही शहानिशा न करता या महाविद्यालयाच्या सचिवांनी म्हणजेच महाविद्यालयाच्या सर्वेसर्वा प्रा.डॉ.बी.पी. रोंगे सरांनी आज मिडीयासमोर ही अत्महत्या करणंयामागे या मुलीचे घरगुती कारण असल्याचे सांगणे हे एकुणच येथील तमाम विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे..! याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे असेच प्रकरण कांही वर्षापूर्वी घडलेले होते. तीच पुनरावृत्ती आज घडलेली असताना याबाबत कोणतेही गांभीर्य न बाळगता, कोणतीही चौकशी न करता या महाविद्यालयाच्या जबाबदार सर्वेसर्वा बी.पी. रोंगेंचे हे स्टेटमेंट महाविद्यालयात पुर्ण विश्वासाने शिक्षणास पाठविणार्या प्रत्येक पालकांची चिंता वाढविणारे असेच आहे..!
आज गरज आहे ती या महाविद्यालय परिसरातील वस्तीगृहाच्या गेटवरील सुरक्षा रक्षकापासून ते येथील अंतर्गत कर्मचार्यांच्या चौकशीची.. शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारी मोनिका निश्चितच कमजोर नसणार आहे. एवढी टॅलेन्टेड मुलगी आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय असा आतताईपणे घेईल यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही…
एवढा आटापिटा पंढरपूर लाईव्हचा यासाठीच आहे की, मोनिकाच्या आत्महत्येनंतर तरी नेमके या मागचे गुढ उकलले जावे व खर्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी.. जेणेकरुन मृत्युनंतर तरी मोनिकाला न्याय मिळावा व महाराष्ट्रातील अव्वल स्थानी असणार्या स्वेरी या महाविद्यालयाचा नावलौकीक टिकुन रहावा..!
नेमके काय आहे मोनिका आत्महत्या प्रकरण जाणुन घ्या…
गोपाळपूरच्या स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या मोनिकाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर नजीक असणार्या गोपाळपूर येथील अभियांत्रीकी महाविद्यालयातील (स्वेरी) एका विद्यार्थिनीने वस्तीगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने आज महाविद्यालयीन परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. बी.पी. रोंगे यांच्या या प्रसिध्द महाविद्यालयातील आत्महत्तेची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही कांंही वर्षापूर्वी येथे आत्महत्येचा प्रकार घडला होता. त्यामुळे या महाविद्यालयीन प्रशासनाच्या कार्यपध्दतीबाबत व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आढळत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर पासुन कांही अंतरावर असणार्या गोपाळपूरमधील स्वेरी या अभियांत्रीकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणार्या मोनिका दत्तात्रय चवरे (वय-21), रा. पेनुर, ता.मोहोळ या विद्यार्थिनीने आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलींचे वस्तीगृह नं. 1 खोली नं. 1122 या आपल्या राहत्या खोलीमधील पंख्याला ओढणीने गळफास लावुन आत्महत्या केली आहे. मोनिकाने आत्महत्येपूर्वी आपल्या घरी फोन केल्याचे समजते.
महाविद्यालयाीन सुत्रांकडून या आत्महत्येबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मानांकीत अभियांत्रीकी महाविद्यालयामध्ये स्वेरीचा उल्लेख केला जातो. त्यामुळे आत्महत्येसारख्या अशा घटना रोखण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना राबविणे आवश्यक बनले आहे. यापूर्वी याच महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण समोर आल्यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. मोनिकाच्या आत्महत्येचे कारण स्वेरीचे सचिव बी.पी. रोंगे यांनी घरगुती असल्याचे सांगितले असले तरी याचे खरे कारण काय याचा उलगडा पुढे होईलच; परंतु मोनिकाच्या या चटका लावुन जाणार्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरल्याचे चित्र आज दिवसभर जाणवत होते. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास एपीआय गाडे हे करीत आहेत.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
गोपाळपूर येथील स्वेरी या अभियांत्रीकी महाविद्यालयात महाराष्ट्रासह परराज्यातीलही अनेक मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहणार्या अशा बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मागे एकदा याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज मोनिकाच्या दुर्दैवी आत्महत्येमुळे या महाविद्यालयातील वस्तीगृहात आपल्या मुलांना ठेवणार्या पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता व चिंता पसरली आहे. लाखो रुपये खर्चुन आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्यापासुन दुर शिक्षणासाठी पाठवताना पालक लाख वेळा विचार करत असतात. महाविद्यालयाची गुणवत्ता तसेच सुरक्षीतता किती चांगली आहे यावरुन आपल्या पाल्यांचा प्रवेश पालक निश्चित करत असतात. स्वेरी ला महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील पालकांची प्रथम पसंती समजले जाते. परंतु स्वेरीतील आत्महत्येच्या या घटनेच्या पुनरावृत्तीमुळे पालकांमध्ये आत्ता या महाविद्यालायातील आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षीततेविषयी धास्ती वाढलेली आढळून येत आहे.

