पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहराजवळ असणार्या सांगोला रोडवरील दाते मंल कार्यालयाजवळ एका इसमावर पुर्वमैनस्यातून तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पंढरपूर शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर-सांगोला रोडवरील पंढरपूरपासुन कांही अंतरावर असलेल्या दाते मंगलकार्यालयाजवळ पंढरपूर तालुक्यातील बोहाळी या गावचे शेतकरी सुदाम हजारे (43) हे आपल्या गावाकडे जात असताना त्यांच्याच गावातील हणमंत जाधव याने त्यांना रस्त्यावर अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली. यानंतर त्याचे इतर तीन साथीदारांनी आपल्याजवळील तलवार, गाडीची टॉमी आणि लाकडाचे दांडक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सुदाम हजारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तशाच अवस्थेत टाकुन आरोपींनी पळ काढला. दरम्यान रस्त्यावरुन जाणार्या कांही लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
सुदाम हजारे आणि हणमंत जाधव यांचे पूर्वीपासुनच वैमनस्य असून यापूर्वीही त्यांच्यात भांडणे झालेली आहेत व दोघांनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केलेले आहेत. त्यामुळे हणमंत जाधव याने पुर्वीचा राग मनात धरुन हा हल्ला केला असल्याची चर्चा आहे.
या गुन्ह्यातील आरोपी ॠषीकेश मेटकरी रा. दाळे गल्ली, पंढरपूर, विजय तावरे रा. सेंट्रल नाक्यामागे, पंढरपूर, विकी मेटकरी रा. वीज वितरण मागे, पंढरपूर यांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली असून या तीन्ही गुंडांना हणुमंत जाधव याने सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याची चर्चा आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून रात्रीच्या अंधारात हजारे मारला गेला असल्याचे समजुन हे आरोपी पळून गेले होते. परंतु हल्ला झाल्यानंतर कांही लोक जमा झाले आणि त्यांनी जखमी सुदाम हजारे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविल्याने त्यांचा जीव वाचला. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आरोपींना ताब्यात घेतले. तालुका पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली असून आरापींविरुध्द भादंवि कलम 326, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास एएसआय पानसरे हे करीत आहेत..

