पंढरपूर (प्रतिनिधी):- भारत भालके तुम आगे बढो हम तुम्हारे। अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदार भारतनाना भालके यांचे कौतुक करत त्यांना पंढरपूरकरांनी साथ देण्याचे आवाहन केले. पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आय व तिर्थक्षेत्र विकास आघाडी च्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थावर करण्यात आला. यावेळी पाच हजाराहून अधिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार भारतनाना भालके, आ.रामहरी रुपनवर, काँग्रेस आय चे नेते चेअरमन कल्याणराव काळे, धर्मा भोसले, प्रकाशबापु पाटील, दिनकरभाऊ पाटील, काँग्रेस आयचे पदाधिकारी सुहास भाळवणकर, शायरा काझी, राजश्री लोळगे, शंकर सुरवसे, किरण घाडगे, नागेश गंगेकर, नामदेव भुईटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव, सुरेश नेहतराव, बाळासाहेब होरणे, राहुल साबळे, संतोष डोंबे, बाळासाहेब नेहतराव, दिपक येळे, बलराज शिकलकर, महादेव भालेराव, विशाल धोत्रे, सुधीर धोत्रे, संतोष धोत्रे, दिलीप फडतरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.अशोक चव्हाण म्हणाले की, पंढरपूर शहराच्या विकासासाठी आ.भारतनाना भालके यांची सतत तळमळ असते. विधानसभेत पंढरपूरचे प्रश्न परखडपणे मांडून पंढरपूरसाठी निधी खेचून आणण्यात त्यांना यश मिळालेले आहे. भारतनाना हे एक समर्थ आमदार असून काम करण्याची मोठी उर्जा त्यांच्यात आहे. आम्ही सतत त्यांच्या पाठीशी आहोत. भारतनाना आगे बढो हम तुम्हारे साथ है। अशी घोषणा देऊन त्यांनी आमदार भारतनाना भालके यांचे कौतुक करत नगरपरिषदेची सत्तासुत्रे आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखालील तिर्थक्षेत्र विकास आघाडी व काँग्रेसच्या उमेदवारांच्या हातात द्यावीत अशी विनंती पंढरपूरकरांना दिली. मी विठ्ठलाच्या नगरीत पंढरीत विठ्ठलाच्या समोर उभा आहे. पंढरीत कधी खोटे बोलु नये. आम्ही सत्य तेच बोलतो व ते करुनही दाखवतो. मी दिलेल्या या आश्वासनाची पुर्तता नक्कीच करीन. काँग्रेस आय व तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संतोष नेहतराव या तरुण व उच्चशिक्षीत युवकाच्या रुपाने एक मजबुत पर्याय पंढरपूरकरांसमोर आहे. मागील पाच वर्षाचे चित्र बदलायचे असेल तर आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. आमच्या आघाडीतील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारही उमदे व चौफेर सक्षम असे आहेत. विकासाची खरी दृष्टी असणार्या भारतनाना भालके यांच्या शोधक नजरेतून निवडल्या गेलेल्या या सर्व उमेदवारांना आपण भरघोष मतांनी विजयी करुन काँग्रेसच्या हाती सत्ता द्यावी. आपल्या विश्वासाचे सोने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
आमदार भारतनाना भालके म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने आम्ही मागील पंचवार्षिक निवडणुक लढविली व बहुमताने जिंकून दाखविली. पंढरपूरच्या विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून एका चांगल्या विचाराने व चांगल्या पध्दतीने अडीच वर्ष पंढरपूर नगरपरिषदेत काम केले. गेल्या 20 वर्षात ज्यांना कांही करता आले नाही असे नेत्रदिपक काम आम्ही केले. आमच्या हाती अडीच वर्ष सत्ता येते ना येते तोच काहींच्या पोटात दुखू लागले. लक्ष्मीचे दर्शन घडवून घोडेबाजार झाला..! अन् आमच्या हातची सत्ता विरोधकांनी अक्षरश: कपटाने मिळवण्याचे फार मोठे पाप केले. आम्ही पंढरीतील पंढरीतील धुळ कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी पंढरपूरकरांच्या नाकी-तोंडी धुळ घालण्याचे पातक केले. आमच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात पंढरपूर शहराच्या रस्त्यांच्या कामासाठी निधी आणला. संत तुकाराम महाराज चर्तुजन्मशताब्दी निमित्त तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कोट्यावधींचा निधी आणला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आमचे सरकार सत्तेत होते. परंतु कांहीजण सांगतात की, हा निधी आम्ही आणला..! ‘‘लेकरु कोणाचं अन् नांव कुणाचं..?’’ हेच कळेनासे झालेय. इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक, शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हे सर्व रस्ते, चंद्रभागेवरील जुन्या दगडी पुलाशेजारील नविन पुल, एक कोटी 70 हजार रुपयांचे पाण्याचे बोअर पाडण्याचे काम, पाण्याच्या टाक्यांचे काम, शाळांना संगणक देण्याची कामे, एसटी स्टॅन्ड शेड, कांही रस्त्यांची काँक्रीटीकण, एटीएम वॉटर मशिन, व्यायाम शाळेसाठी निधी, पंढरीतील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरणाचे काम आदींसह विविध मोठी कामे आमच्या काळात झाली. या सर्वांसाठी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना निधी मिळालेला होता.
काँग्रेस आय व तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव म्हणाले की, ‘‘पंढरपूरची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. पंढरपूरच्या नगरपालिकेत आधुनिक टेक्नॉलॉजीचा काडीमात्र वापर होत नाही. कुणीही जावुन विचारा येथे अत्यावश्यक असणारी यंत्रणा कितपत कार्यरत आहे ते? आम्ही सातत्याने क्रांतीसिंह नाना पाटील चौकात नवरात्र महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करत असतो. यावेळी विविध सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम राबवुन सर्व पंढरपूरकरांना आनंद देण्याचे काम करत आलो आहोत. आत्ता या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की, आम्हाला निवडून दिल्यास मी आमचे सर्व उमेदवार शहरात आजतागायत कधी घडला नाही असा विकास करुन दाखवु. पंढरपूर शहराच्या सर्वांगीन विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द असेन.
यावेळी काँग्रेसचे नेते धर्मा भोसले, आ.रामहरी रुपनवर, चेअरमन कल्याणराव काळे, नामदेव भुईटे, बजरंग बागल आदींसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.



