तब्बल 890 किलो विषारी आंबे नष्ट
23 Apr. 2017
ठाणे – आंबे पिकवण्यासाठी जीवघेण्या कॅल्शियम कार्बाईड या रसायनाचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उल्हासनगरात उघडकीस आली. महानगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासनाने अशा आंबे विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड टाकली. यावेळी जीवघेण्या रसायनांचा वापर करून पिकविलेले तब्बल 890 किलो आंबे जप्त करण्यात आले.
हे आंबे डंपिंग ग्राऊंडवर नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे आंबा प्रेमींमध्ये खळबळ माजली आहे. सगळ्यांचेच आवडते आंबे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. हे आंबे बाजारात येताना पूर्णपणे पिकलेले नसतात. मात्र ते लवकरात लवकर पिकवून विकण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा वापर करण्यात येतो. या रसायनामुळे कॅन्सर होण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अशाप्रकारे उल्हासनगरमध्ये आंबे पिकवले जात असल्याची माहिती महापालिकेला मिळाली. या माहितीनुसार, शुक्रवारी महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उल्हासनगर कॅम्प 1 भागातल्या भाजी मंडईत असलेल्या चार आंब्याच्या दुकानांवर धाड घातली.
