नवेगाव खैरी, कन्हान पम्पिंगचा वीजपुरवठा खंडित
नागपूर, २८ मे
वादळी वारे आणि मुसळधार पावासामुळे नवेगाव-खैरी हेडवर्क्स आणि कन्हान पम्पिंग स्टेशन या दोन्ही ठिकाणी रविवार, २८ मे रोजी सायंकाळी ६ पासून वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागपूर शहराला सोमवारी सकाळी अतिशय कमी दाबाने व मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. टँकर सेवाही बाधित राहणार आहे. हे वृत्त लिहित असताना नवेगाव खैरी तसेच कन्हान पम्पिंग ही दोन्ही केंद्रे कार्यान्वित झाली नव्हती.
नवेगाव- खैरी पम्पिंग स्टेशन येथे झालेल्या विद्युत खंडामुळे (१४ मे रोजी १२ तास; १८ मे रोजी ३ तास) आधीच गोरेवाडा तलावाची पातळी ३१२.६० मीटर म्हणजे वर्षातील सर्वात कमी स्तरावर येऊन पोहोचली आहे. आजच्या नवेगाव-खैरी आणि कन्हान येथील ब्रेकडाऊनमुळे सोमवारी सकाळी पाणीपुरवठा तसेच टँकर पुरवठा बाधित राहील. कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची मुख्य वाहिनी आणि पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्राच्या फीडर मेनवर अवलंबून असलेल्या जलकुंभांना अतिशय मर्यादित पाणीपुरवठा होईल, असे ओसीडब्ल्यूतर्फे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
पूर्वी गोरेवाडा तलावातून कच्चे पाणी पेंच १, २ व ३ या गोरेवाडास्थित जलशुद्धीकरण केंद्रांना पुरवले जात. हे कच्चे पाणी नागपूरपासून ४५ किमीवरील नवेगाव खैरी येथून उजव्या कालव्याच्या माध्यमातून महादुला पम्पिंग स्टेशन येथून गोरेवाडा तलावात येत व तिथून प्रक्रियेसाठी उचलले जात. मात्र, थेट जलवाहिनी कार्यान्वित झाल्यापासून (उजव्या कालव्याऐवजी) नवेगाव- खैरी येथून ब्रेक प्रेशर टँकमधून पेंच १, २ व ३ केंद्रांना पाणी पुरवले जाते. आता गोरेवाडा तलाव केवळ निकडीच्या वेळी वापरासाठीचा जलाशय बनला आहे.
अर्थात, सद्य:स्थितीत नवेगाव खैरी येथील हेडवर्क्स शहरातील महत्त्वाच्या जलशुद्धीकरण केंद्रांत, गोधनी येथील पेंच ४ आणि गोरेवाडा येथील पेंच १, २, ३ पाणीपुरवठा करतात. तर केवळ १६ एमएलडी क्षमतेचे जुना गोरेवाडा केंद्र गोरेवाडा तलावावर अवलंबून आहे.
साधारणपणे, गोरेवाडा तलावाची पातळी ३१५ मीटर (समुद्र सपाटीपासून) पर्यंत राखल्यास नवेगाव खैरी येथे संपूर्ण शटडाऊन झाले तरी सर्व जलशुद्धीकरण केंद्रे आपल्या पूर्ण क्षमतेने ७ ते ८ दिवस काम करू शकतात व ६० टक्के शहराला (पश्चिम, मध्य, दक्षिण आणि उत्तर) पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य असते.
मनपा-ओसीडब्ल्यूने आधीच कळवले आहे की, गोरेवाडा तलावातील पातळी अतिशय कमी झालेली असून, नवेगाव-खैरी येथे पुन्हा शटडाऊन झाल्यास संपूर्ण शहराला पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागेल. असे असूनही ओसीडब्ल्यू आणि मनपा नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून प्रयत्नरत आहेत. नागरिकांनीही अशा परिस्थितीत सहकार्य करावे, असे आवाहन मनपा व ओसीडब्ल्यूतर्फे करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
.





