👁 11 Views

जनावरे खरेदीविक्री बंदीचे देशभरात पडसाद

नवी दिल्ली/कोलकाता
कत्तलीसाठी पशू बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर देशभरात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदीचा निर्णय घटनाविरोधी असून, आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला आहे. तसेच दक्षिणेतील राज्यांमध्ये या निर्णयाला विरोध वाढला असून, ३१ मे रोजी निदर्शने करण्याचा इशारा द्रमुकने दिला आहे. आयआयटी मद्रासमध्ये काही विद्यार्थ्यांनी ‘बीफ फेस्ट’ आयोजित केले. दरम्यान, केरळमध्ये बीफ फेस्टिव्हल आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसने निलंबित केले आहे.
गोवंश हत्या रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जारी करून नियमावली जाहीर केली. गाय, बैल, म्हैस, वासरू या गोवंश जनावरांसह उंट यांची कत्तल करण्यासाठी पशू बाजारातच खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली आहे. केरळमधील काँग्रेस आणि डाव्यांनंतर आज पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि तामीळनाडूत द्रमुकने केंद्र सरकारवर टीका केली. सरकारचा हा निर्णय आम्ही स्वीकारणार नाही. बंदीचा हा निर्णय घटनाविरोधी असून, त्याविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. लोकांनी काय खावे, काय खाऊ नये हे सरकार ठरवू शकत नाही. मोदी सरकारचा निर्णय राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणारा आहे. सरकारे येतात आणि जातात; पण लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा खेळ सरकार करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय केंद्र सरकारने रमझान महिन्यातच का घेतला, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
आयआयटीत ‘बीफ फेस्ट’
आयआयटी मद्रास येथील काही विद्यार्थ्यांनी ‘बीफ फेस्ट’चे आयोजन केले. दरम्यान द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध बुधवारी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. अशा बंदीमुळे व्यापाराला मोठा फटका बसेल, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे ३ कार्यकर्ते निलंबित
केरळमध्ये युवक काँग्रेसने काल रविवारी ठिकठिकाणी बीफ फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर वासराची कत्तल केली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. आज युवक काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी जाहीर केले. गाय ही सर्वांसाठी पवित्र आहे, असे सुरजेवाला यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल या घटनेची निंदा केली आहे. पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर, किरण रिजीजू यांना सल्ला द्या
काँग्रेसला सल्ला देणाऱ्या भाजपने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांना आधी सल्ला द्यावा. या नेत्यांच्या राज्यांमध्ये गोवंश जनावरांची हत्या होत आहेत, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
मेघालयात बंदी नाही; भाजप नेते बीफ खातात
गोवंश हत्याबंदीला ईशान्य हिंदुस्थानातील राज्यांमध्ये विरोध कायम आहे. आपल्या सरकारच्या निर्णयाविरुद्धच तेथील भाजप नेते भूमिका घेत आहेत. मेघालयात बीफ बंदी होणार नाही. येथील बहुतांशी भाजप नेतेच बीफ खातात, असे भाजपचे तुरा जिल्हाध्यक्ष बर्नाड एन. माराक यांनी सांगितले. आमच्या राज्यात कशावर बंदी घालायची आणि कशावर नाही हे आम्हीच ठरविणार. मेघालयात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार आले तर बीफ आणखी स्वस्त करू, असे ते म्हणाले

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *