महाराष्ट्र हागणदारीमुक्त मोहिमेत आघाडीवर असून राज्यातील २६३ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.
नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. (छाया-प्रशांत नाडकर)
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी गेल्या तीन वर्षांत केंद्राकडून ६७ हजार कोटी
शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळेच राज्यातील मेट्रो व अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ७६ हजार ५२३ कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकैय्या नायडू यांनी मंगळवारी येथे दिली.
सह्य़ाद्री अतिथीगृहात आज नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राला ६७ हजार कोटी रुपये विविध प्रकल्पांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी २० हजार १०० कोटी, सात स्मार्ट शहरांकरिता १९ हजार १०० कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १३ हजार ५६४ कोटी, अमृत योजनेसाठी सात हजार ७५९ कोटी , स्वच्छ भारत योजनेसाठी सात हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आल्याचे नायडू यांनी सांगितले. महाराष्ट्र हागणदारीमुक्त मोहिमेत आघाडीवर असून राज्यातील २६३ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. आठ लाख ९९ हजार सार्वजनिक शौचालये उभारणीच्या उद्दिष्टांपैकी राज्याने चार लाख सहा हजार शौचालये बांधून ८७ टक्के उद्दिष्ट प्राप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत राज्यामध्ये मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून ३६० किलोमीटर लांबीचे नऊ मेट्रो प्रकल्प आणि मोनोरेल प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





