कळंब – एकीकडे कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग कायम असताना कर्जबाजारापणाला कंटाळून कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोहा येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि.९) सकाळी उघडकीला आली.
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील संदीप बलभीम शेळके असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. संदीप शेळके याच्या मागे आई- वडील मोठा भाऊ आहे. आई, वडील भोळसर तर मोठा भाऊ अपंग असल्यामुळे सर्व जबाबदारी संदीप याच्यावरच होती. खामसवाडी शिवारात त्याला एकूण १.९३ हेक्टर क्षेत्र आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक खामसवाडी शाखेचे ८० हजार खासगी मिळून असे जवळपास अडीच लाखांचे कर्ज होते. शेतातून काहीच उत्पन्न मिळत नसल्यामुळे बँकेचे इतर कर्ज कसे फेडायचे या विचाराने संदीप हवालदील झालेला होता. त्यामुळे त्याने शेतात ऊस लावण्याचा निर्णय घेतला होता. दिनांक जून रोजी संदीप सकाळी शेतात ऊस लावण्यासाठी गेला. मात्र, रात्री परतलाच नाही. त्याने रात्रीच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घडला प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आला.
मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला : शेतकऱ्यांच्यामागण्यांसाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे संदीप शेळके या तरुण शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या केली. यामुळे संतापलेल्या मोहा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पोलिस,महसूल यंत्रणा चार तास फिरकलीच नाही : शनिवारीसकाळी ही घटना उघडकीला आल्यानंतर सकाळी वाजता शिराढोण पोलिसांना तसेच महसूल यंत्रणेला कळविण्यात आले. मात्र पोलिस तब्बल चार तास उशिराने दाखल झाले. तर महसूलचा अधिकारी अथवा कर्मचारी मृतदेह मोहा येथे शवविच्छेदनासाठी नेल्यानंतरही हजर झालेला नव्हता. यामुळे ग्रामस्थ संतापल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका घेतल्याने आरोग्य केंद्रातही गोंधळ उडाला होता.
संपाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील खामसवाडी येथे ‘आत्महत्या करणार नाही’, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हमीपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सरकारने स्वामिनाथन समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी देण्यासाठी खामसवाडीतील हजारांवर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल एक किलोमीटर लांबीचे पत्रच लिहिले. यावर संदीप शेळके याचीही स्वाक्षरी आहे. पोस्टामार्फत दोन दिवसांत हे पत्र तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार होते. मात्र, हे हमीपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याच्या आतच तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने, हा प्रश्न गंभीर बनल्याचे दिसून येत आहे.
Posted inMaharashtra
आंदोलनाची धग कायम असताना खामसवाडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





