👁 11 Views

पालखी मार्गावर अतिक्रमाणांचा विळखा कायम

दुघर्टने होण्याची शक्‍यता ः पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

फुरसुंगी, दि. 10 (प्रतिनिधी) – पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणे हटवुन पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे आदेश देवुनसुध्दा सत्यपुरम ते दिवेघाटादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे मोठ्या डोलात उभी आहेत. एकाही अतिक्रमणांवर जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाकडुन कोणतीच कारवाई झालेली नाही.रस्त्याचीही दुरुस्ती झालेली नसल्याने आठ दिवसांवर येवुन ठेपलेला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळा विविध समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. या सर्वांकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देवुन या समस्या दुर करावेत, अशी मागणी भाविक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देवुनसुध्दा सत्यपुरम ते दिवेघाटादरम्यानच्या पालखी मार्गावरील एकही अतिक्रमणे हटविले गेले नाही. तसेच रस्त्याचीही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापालची लाट उसळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन दर पालखी सोहळ्यावेळी राज्याचे मंत्री मोठ्या दिमाखात या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या घोषणा करतात. मात्र या कामाला काही केल्या मुहुर्त लागत नसल्याने लाखो वारकऱ्यांना या पालखी सोहळ्याच्या वेळी आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असुन अरुंद रस्त्यामुळे भीषण दुर्घटना होण्याचा धोका संभवतो.
तसेच या मार्गावर सत्यपुरम ते दिवेघाटा दरम्यान अनेकांनी अतिक्रमणे ककून रस्त्यातच दुकाने व व्यवसाय थाटली आहेत. त्यामुळे अरुंद असणारा हा रस्ता अजुन अरुंद झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते मात्र उघडपणे डोळेझाक करताना दिसत आहे. दिवे घाटातील धोकादायक रस्ता पार करताना दरडींचा धोकादायक भाग कोसळुन केव्हाही अपघात होण्याची टांगती तलवार सतत भाविकांच्या डोक्‍यावर लटकत असते.त्यामुळे या निसर्गरम्य घाटमार्गातुन भाविकांना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व हलगर्जी कारभारामुळे जीव मुठीत घेवुनच रस्ता पार करावा लागत आहे.
सत्यपुरम, भेकराईनगर, जकातनाका , पॉवर हाऊस, मंतरवाडी आदी परिसरात भर रस्त्यातच कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने सर्वांचेच आरोग्य धोक्‍यात आले. पालखी सोहळा आठ-दहा दिवसांवर येवुन ठेपला असतानासुध्दा या मार्गाची साफसफाई व दुरुस्ती होताना दिसत नाही. सर्वत्र अतिक्रमणे व रस्त्यात होर्डीग्ज,दुकानांचे मोठमोठे फलक लावल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे.
येणाऱ्या पालखी सोहळ्याअगोदर सर्व समस्या सोडवुन भाविकांना दिलासा द्यावा. या मार्गावरील अतिक्रमणे हटवुन अरुंद रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. धोकादायक दिवेघाटातील रस्त्याला संरक्षक कठडे बसवुन, दरडींचा धोकादायक झालेला भाग हटवुन रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे.
रेल्वे उड्डाणपुल धोकादायक
फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलावर व पुलाखाली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे 8-10 सुरक्षा कठडे गेल्या अनेक दिवसांपासुन तुटलेले आहेत. पुलावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असून रस्त्यावर खडी, माती, जिन्यात घाण, कचरा व दुर्गंधी पसरली आहे. याकडे प्रशासन का डोळेझाक करते असा सवाल नागरीकांनी केला आहे.
रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे…
सासवड मार्ग संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग आहे. म्हणून त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे असे नाही. परंतु या रस्त्यावर सध्या वाढलेली रहदारी या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज सांगते. पुणे शहर दिवेघाटाच्या पायथ्यापर्यत विस्तारीत होत आहे. त्यामुळे दिवेघाटापर्यतच्या रस्त्याचे रुंदीकरण व अतिक्रमणे हटविणे अत्यावश्‍यक आहेच. सासवड, जेजुरी व बारामती येथे वाढत असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे दळणवळणासाठी रुंदीकरण महत्वाचे बनले आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास साधण्यासाठीही रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *