👁 9 Views

किरकोळ कारणावरुन कापली जातेय आयुष्याची दोरी!


– आठ दिवसात पाच घटना : आत्महत्येचे प्रमाण वाढतेय
– समुपदेशनाची आवश्‍यकता
पंकज खोले
पिंपरी – किरकोळ कारणावरुन आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसात किरकोळ कारणावरुन पाच ठिकाणी आत्महत्येचे प्रकार घडले. अगदी शुल्लक कारणावरून ही मानसिकता तयार झाल्यामुळे ते रोखण्यासाठी समुपदेशाची नितांत आवश्‍यकता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात.
गेल्या महिन्यामध्ये मुलाला बारावीत कमी गुण मिळाल्याने विश्‍वंबर पिल्ले यांनी आत्महत्या केली. बाथरुममध्ये शॉवरच्या ओढणीच्या सहाय्याने त्यांनी आयुष्याची दोरी कापली. मुलाला वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्‍यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रहाटणी येथे सहा दिवसांपूर्वी संगमेश्‍वर बिराजदार या तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. अभियांत्रिक शाखेत तो शिक्षण घेत होता. घरातील सर्वजण एका लग्नानिमित्त बाहेर गेले होते. त्याला अनेकवेळा फोन करुनही त्याने प्रतिसाद दिला नसल्याने नातेवाईकांनी अखेर धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. परिक्षेत अपयश आल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्या मागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
बुधवारी (दि. 7) चिखली येथे 24 वर्षीय विवाहीत महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली. “वायसीएम’ रुग्णालयात उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याने “व्हिसेरा’ वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या सर्व घटनांचे नेमके कारण समोर आले नसल्यामुळे हे पाऊल कोणत्या कारणासाठी उचलले हे समजू शकले नाही. तसेच, दोन दिवसांपूर्वी दापोडी येथे अभिजीत पांडे या पोलीस कर्मचाऱ्याने मुलाने आत्महत्या केली. अभिजीतचा आठ दिवसांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दापोडीत राहत्या घरामध्ये रॉकेल ओतून पेटवून घेतले. घरातून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या नातेवाईकांचे जाबजबाब आणि इतर मित्रांकडे चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, ती मानसिकता का तयार होते. याचे उत्तर समजू शकत नाही.
“भगिनी’कडून समुपदेशन
संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या “भगिनी’ या “हेल्पलाईन’द्वारे पालकांना, पाल्यांना मोफत समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येते. मोबाईलवर चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर येथे अनेक पालक पाल्यांचे अनेक प्रश्‍न घेऊन येतात. योग्य समुपदेशन आणि प्रत्येकाचे विचार ऐकून घेतल्यास त्याला आत्महत्येपासून रोखता करता येते. 9822433665 या “हेल्पलाईन’वर मोफत समुपदेश केले जात आहे.
सध्या स्पर्धात्मक युग असल्यामुळे पालकांच्या, शिक्षकांच्या पाल्यांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, त्याचा परिणाम मुलांच्या मनावर आणि शरीरावर होतो. त्यात फेल गेल्यामुळे आपल्याला काय होईल या भितीपोटी ते पाऊल उचलतात. त्यात एकत्र कुटूंब पद्धतीचा अभाव, घरातील वातावरण, मोबाईलचा अतिरेक वापर, सोशल मिडीयाचा विद्यार्थ्यांचा विळखा यामुळे पाल्याची संकुचित वृत्ती होत आहे.
–  सुप्रिया कोठारे, संचालिका, भगिनी हेल्पलाईन.
आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करुन तपास करण्यात येतो. डॉक्‍टराचा अहवाल, नातेवाईकांचे जबाब, तपास या आधारे त्याचा संपूर्ण अहवाल पाठवण्यात येतो. त्यानंतर तो अहवाल उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांच्याकडे पाठवण्यात येतो. आपले आयुष्य हे अनमोल आहे. त्यात चढ-उतार, यश-अपयश येतात. परंतु, त्यावर आत्महत्या हा पर्याय नाही. असुरक्षिततेच्या भावनेतून आत्महत्येचे पाऊल उचलण्यापेक्षा पोलिसांची मदत घ्यावी.
– राम मांडुरके, सहायक पोलीस आयुक्‍त..
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *