औरंगाबाद,दि.24 : भारत–पाक सिमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सैन्य दलातील नाईक संदीप सर्जेराव जाधव यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात आज सकाळी 10 वाजता केळगाव ता.सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक आरती सिंह, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले, तहसीलदार संतोष गोरड यांनी शहीद जवान संदीप जाधव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. सैन्य दलाच्या पथकाने सलामी देऊन शोक धून वाजवून हवेत तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहिली.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात म्हणाले की, शहीद जवान संदीप यांना वीरमरण आले आहे, त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला,त्यांच्या दु:खात शासन सहभागी आहे. देशभक्त जवान शहीद झाल्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे.
खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, सुरेश बनकर, बालयोगी काशीगिरी महाराज आदींनीही यावेळी श्रद्धांजली वाहिली.
शहीद संदीप जाधव यांच्या अंत्यसंस्कारात केळगाव पंचक्रोशीतील हजारो स्त्री पुरुष सामील झाले. यावेळी देशभक्तीपर जयघोषात अंत्यसंस्कार होताना उपस्थितांची मने हेलावून गेली. भारत माता की जय हा नारा भारताची एकात्मता व राष्ट्रवाद दर्शवित होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




