Pandharpur Live-
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आषाढी वारी रद्द झाल्याच्या बातम्या कांही प्रसारमाध्यमातुन प्रसिध्द झाल्या होत्या, या बातम्या निराधार असुन यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसुन सद्यस्थितीत आषाढी वारी रद्द असल्याची केवळ अफवाच असल्याची माहिती वारकरी सांप्रदाय पाईक संघाच्या वतीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
याबाबत वारकरी सांप्रदाय पाईक संघाने दिलेले खालीलप्रमाणे प्रसिध्दीपत्रक
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात संचार बंदी सुरु आहे.यादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची चैत्र वारी पार पडली.प्रशासकिय सुचनांचा मान राखत या वारी करीता वारकर्यांनी संचार बंदी चे उल्लंघन करुन न येता घरी राहूनच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी यातून सामाजिक आरोग्य देखिल राखले जाईल असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे वतीने करण्यात आले होते.त्या आवाहनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद वारकरी बांधवांनी दिला.
मात्र काल एका वृत्तवाहिनीच्या द्वारे राज्यातील सर्वात मोठा ज्ञानोबा-तुकोबारायांचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे अशा आशयाची बातमी दिली व त्याच अनुषंगाने काही इतर माध्यमांकडून ही हि बातम्या लावण्यात आल्या या प्रकारामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील वारकरी भाविक भक्तांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तर पंढरपुर मध्ये ज्या हजारो कुटुंबांची उपजीविका वारीच्या जीवावर आहे तेही लोक हादरुन गेले.
या प्रकरणी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर यांनी तात्काळ या संदर्भात श्रीसंत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख, तसेच प्रशासकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता हि असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही असे कळाले. यानंतर आम्ही सदर वृत्तवाहिनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वृत्त त्वरीत मागे घेत असल्याचे कळवले होते.
आषाढी यात्रेसाठी अध्याप दिड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही सदर बातमी, तसेच या अनुषंगाने लागलेल्या इतर बातम्यांचे मुळे वारकरी संप्रदायामध्ये विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संदर्भात प्रशासनाकडून आलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करत संपुर्ण सहकार्य करण्याची भूमिका वारकरी संप्रदायातील सर्व घटकांनी घेतलेली आहे व या पुढेही कोरोनासंदर्भातील सर्व सुचनांचे गांभिर्याने पालन करण्याचे सहकार्य राहणारच आहे.
तरी सध्यस्थितीत वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी,पालखी सोहळा प्रमुख, तसेच प्रशासकीय स्तरावर आषाढी वारी रद्द करण्यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसून या संदर्भात प्रसारित झालेल्या बातम्या या केवळ अफवाच आहेत असे या निवेदनाद्वारे आम्ही जाहीर करत आहोत.
– रामकृष्ण हनुमंत महाराज वीर
राष्ट्रीय प्रवक्ता
वारकरी संप्रदाय पाईक संघ.

