👁 10 Views

चिंताजनक… सोलापूरातील अनेक झोपडपट्टयांमध्ये सापडत आहेत कोरोना रुग्ण…मृत्युची संख्या 4

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

सोलापूर शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत असून गेल्या चार दिवसांपूर्वी सापडलेल्या 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने शहरातील हा चौथा बळी घेतला असून शुक्रवारी बापूजीनगरात कोरोनाबाधित आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. सोलापुरातील रुग्ण संख्या आता 41 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ, कुर्बान हुसेननगर, मोदी खाना, शिवगंगानगर, जोशी गल्ली, बापूजीनगर, शास्त्रीनगर, इंदिरानगर, जगन्नाथनगर, शेळगी, अयोध्यानगर, मदर इंडियानगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. शहरातील 9 भाग हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व भागांतील दवाखाने, औषध दुकाने, किराणा मालाची दुकाने, बँका बंद ठेवण्यात आले आहेत. या परिसरात सर्व अत्यावश्यक वस्तू घरपोच दिल्या जात आहेत.

सोलापूर शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातही संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
– मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

 सोलापूर शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातही संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून 12 एप्रिल रोजी एक रुग्ण असलेल्या शहरात 24 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 41 पर्यंत गेली आहे. शुक्रवारी सापडलेले दोन्ही रुग्ण हे पूर्वीच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील आहेत. त्यामुळे बापूजीनगरातील रुग्ण संख्या आता 5 झाली आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती. गत तीन दिवसांत केवळ औषध दुकानेच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. तीन दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे निम्म्याहून अधिक शहरवासीयांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार 41 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 2 हजार 890 व्यक्ती होत्या. त्यांपैकी 1 हजार 385 व्यक्तींंचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे अद्यापही 1 हजार 505 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल विभागात 1 हजार 517 लोकांना ठेवण्यात आले होते. त्यांपैकी 894 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. अद्यापही 623 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल विभागात आहेत. आयसोलेशन विभागात आतापर्यंत 1 हजार 104 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 907 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 66 व्यक्तींचे निगेटिव्ह, तर 41 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. 197 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *