पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षिरसागर (वय 35) यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले.
ते महूदकडून पंढरपूर कडे येत असताना पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावाजवळ भरधाव वेगातील सॅन्ट्रो गाडीवरचे त्यांचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते सदर अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. त्यांचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला असुन पुढील कार्यवाही सुरू आहे. अधिक तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे हे करत आहेत.
मागील कांही महिन्यांपूर्वीच क्षिरसागर हे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये रूजू झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते. मुळचे लातुर जिल्ह्यातील क्षिरसागर हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे पोलीस दलातुन हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.


