👁 9 Views

सोलापूर; हरणा नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहुन

 सोलापूर : यंदा पाऊस थांबायचं नाव घेईना. अशात हरणा नदीमधील दुर्घटनाही थांबेनात. मुस्ती परिसरातील हरणा नदीच्या पुराने दुसरा बळी घेतला आहे. हरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याच्या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत.


पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांनी शनिवारी दिवसभर शोध घेतला. पण त्यांचा तपास लागला नाही. जुलैमध्ये हॉटेल कामगाराचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. शिवानंद शरणप्पा वाले (वय ५६, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.


शिवानंद वाले हे शेतातील काम आटोपल्यानंतर शुक्रवारी रात्री घरी येत होते. रात्रीच्या काळोख्या अंधारात नदीपात्रातील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. यामुळे ते वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळपासून दिवसभर ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. नदीपात्रात जास्त पाणी असल्याने ते मिळून आले नाहीत.


१७ जुलै रोजी झालेल्या पावसात नदीला मोठा पूर आला होता. या पुरात शौकत रशीद नदाफ (वय ३८, रा. आनंदनगर, बेघरवस्ती, मुस्ती) याचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शौकत हा मुस्ती गावातील एका हॉटेलमध्ये काम करून आपले घर चालवत होता. नेहमीप्रमाणे हॉटेलमधील काम संपवून रात्री तो बेघर वस्तीवरील आपल्या घरी निघाला होता. हरणा नदीतून जाताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला.

त्यानंतर अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. अनेक वर्षापासून हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी करुनसुध्दा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नव्हते. या युवकाच्या मृत्यूनंतर प्रशासन हलले. त्यानंतर मुस्ती-आरळीदरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने पाठविला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *