रेल्वेमध्ये चढताना पाय घसरून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडल्याच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. काही जणांनी अशा घटना कदाचित प्रत्यक्ष पाहिल्याही असतील.
अशा अपघातांमध्ये काही वेळा प्रवाशांचा प्राण जाण्याच्या घटनाही घडतात. अशीच एका घटना विशाखापट्टणममध्ये घडली आहे; मात्र सुदैवाने ती घटना जिच्या बाबतीत घडली, त्या विद्यार्थिनीचा जीव वाचला आहे. विशाखापट्टणममधील दुव्वाडा रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरणारी विद्यार्थी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली होती. अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवून विद्यार्थिनीची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.
शशिकला असं या मुलीचं नाव असून ती 20 वर्षांची आहे. ती एमसीए या शाखेची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती कॉलेजला जाण्यासाठी अण्णावरमहून दुव्वाडा येथे पोहोचली होती. गुंटूर-रायगडा एक्स्प्रेसमधून उतरताना पाय घसरल्यामुळे शशिकला रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्या मधल्या भागात अडकली. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी तातडीने तिला वाचवण्याचं काम हाती घेतलं. शशिकलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्मचा काही भाग कटरनं कापला.
साधारण दीड तासांच्या प्रयत्नांनंतर विद्यार्थिनीची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर जखमी शशिकलाला रुग्णालयात हलवण्यात आलं, अशी माहिती IANS या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘दाजीवर्ल्ड डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तात दिली आहे. या घटनेमुळे गुंटूर-रायगडा एक्स्प्रेसला दीड तास उशीर झाला. शिवाय, या मार्गावरच्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला. दरम्यान, देशभरात अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांमध्ये अनेक नागरिकांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडतात. यासाठी काही वेळा नागरिकांचा, तर काही वेळा रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. रेल्वेकडून नागरिकांना दक्षतेसाठी आवाहन केलं जात असतं; मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना कुठे ना कुठे तरी घडत राहतात.



