Pandharpur Live News Online: बुलढाणा जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. बुलढाण्याच्या राजुरा जंगल परिसरात एका तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, मृत समजली गेलेली शिवानी चक्क जिवंत होऊन पोलीस ठाण्यात हजर झाली.
एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना बुलडाण्यामध्ये घडली आहे. वडिल आणि भावाने मुलीचा खून केल्याची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली. पोलिसांनी बाप आणि भावाला अटकही केली. पण, अचानक मयत मुलगी पोलीस स्टेशनला पोहोचली आणि मी जिवंत आहे, असं ठणकावून सांगितलं.

हे पाहून पोलिसांनी चांगलाच धक्का बसला. मग, जळगावमध्ये सापडलेला मृतदेह कुणाचा? असा सवाल उपस्थितीत करत पोलीसही पुरते गोंधळले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात राजुरा जंगल परिसरात शिरच्छेद झालेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. खून झालेली तरुणी चक्क जिवंत पोलीस स्टेशनला पोहोचली आहे. मुलीच्या हत्येच्या आरोपात अटक असलेल्या वडील आणि भावाला सोडण्याची मागणी या तरुणीने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील खकणार येथून शिवानीच्या वडिलांना आणि भावाला खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली होती. या दोघांनी शिवानीच्या खुनाची कबुली देखील दिली होती. पण, आता मुलगी जिवंत असल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?
“जळगावमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती, मध्य प्रदेशमधील खकणार इथं एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. तिथे असं लक्षात आलं की, शिवानी नावाच्या मुलीचा तिच्या भाऊ आणि वडिलांनी खून केल्याची माहिती मिळाली. दोघांनी गुन्हाही कबूल केला होता. आता दोघांनी कबुली दिल्यामुळे दोघांना अटक केली. जळगावमध्ये ज्या अज्ञात महिलाचा मृतदेह सापडला होता, त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. त्याचा डीएनए तपासणीसाठी दिला होता. अनोळखी महिलेचा ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं. पण, खकणार पोलीस स्टेशनमधून पोलीस निरिक्षक अभिषेक जाधव यांचा आम्हाला फोन आला. सदरील प्रकरणामध्ये शिवानी बापूराव करमेकर ही जिवंत असल्याचं सांगितलं. त्या तरुणीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलावलं आहे, तिचा जबाब नोंदवला आहे. पुढील तपासा सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.

तसंच, या प्रकरणामध्ये आरोपींनी दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून खोटी माहिती देत आले, पोलीस कोठडीत असताना आणि न्यायालयाामध्ये हजर केले असता त्यांनी खोटी माहिती दिली, आता याबद्दल तपास करत आहे’ असंही नितीन पाटील यांनी सांगितलं.
तो मृतदेह कुणाचा?
दरम्यान, जळगाव जामोदमध्ये सापडलेला मृतदेह कोणाचा आहे, तिला मारणारे मारेकरी कोण? शिवानीच्या वडील आणि भावाने खुनाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर का घेतला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

