पंढरपूर : सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी श्री. पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर, संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे *मराठी भाषा आणि आपण..* ह्या विषयावर आय. ए .एस. डॉ. किरण कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याला पालकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून दाद दिली. प्रशालेत *पासवर्ड* या वाचन प्रेरणा कार्यक्रमांतर्गत.. वाचाल… तर वाचाल ! यावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या विदुषी प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई मॅडम यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब रहावे, त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणे वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि वाचनातून त्यांच्या आयुष्याला एक प्रगल्भता आणि नवचैतन्य यावे म्हणून पालकांनी आपल्या पाल्याकडे वाचाल…तर वाचाल..! या उक्ती प्रमाणे भविष्य घडवि ण्यासाठी वाचन प्रक्रियेमध्ये पालकांचे योगदान आणि सहकार्य किती अनमोल आहे हे समजावून सांगत असताना पालकांना अनेक उदाहरणे देत प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी पालकांना आवाहन देताच पालकांनी देखील तसे प्रामाणिकपणे आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याचे अभिवचन दिले.
प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (IAS) यांनी अतिशय सोप्या शब्दात पालकांना आणि विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. मराठी भाषेची सद्यस्थिती तसेच मराठी भाषेबद्दलची व्याप्ती याविषयी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आपले विचार मांडत असताना ‘आपल्या पाल्याचा आपणच भूमिका आदर्श (Role model) असले पाहिजे.’ वाचन संस्कृती या विषयावर आधारित व्याख्यानात वाचनामुळे मिळणाऱ्या ज्ञानाची आणि अनुभवांची माहिती युटोपियन शुगर्स प्रा. लि.चे मा. श्री. उमेशजी परिचारक यांनी दिली. मागील वर्षभर केल्या गेलेल्या वाचन उपक्रमांचे फायदे सांगितले.तसेच पालकांची मते घेतली. यात पालकांनी हा उपक्रम असाच चालू रहावा अशी इच्छा व्यक्त केली.
मा. रोहनजी परिचारक यांनी पालक व विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीमध्ये मातृभाषेच्या वाचनाने होणारे फायदे नमूद केले. तसेच युनिक फीचर्सचे संचालक मा. श्री. आनंद अवधानी यांनी मागील वर्षभरात झालेल्या पासवर्ड अंतर्गत वाचन आणि पासवर्ड या मासिकाचे यश याचे दाखले देत यापुढेही हे कार्य सुरू ठेवण्याकरिता पासवर्ड या मासिकाच्या नव्या अंकाचे अनावरण केले, संस्थेचे रजिस्ट्रार मा. श्री.गणेशजी वाळके, मुख्याध्यापक एस. पी. कुलकर्णी, डॉ.किरण कुलकर्णी यांच्या पत्नी राजश्री कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी व्याख्यानाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषय शिक्षक मंगेश भोसले यांनी केले.तर कर्मयोगी विद्यानिकेतन आणि कर्मयोगी फाऊंडेशन शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाची उपस्थिती लावली.