👁 5 Views

नाशिक – सोलापूर एसटी बस आगीत खाक मिरजगावजवळील दुर्घटना

नाशिक – सोलापूर एसटी बस आगीत खाक मिरजगावजवळील दुर्घटना

नाशिकहून सोलापूरकडे जात असलेल्या एसटी बसला नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथे शुक्रवारी (दि. 24) दुपारी आग लागली. त्यात संपूर्ण बस खाक झाली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 40 प्रवासी सुखरूप बचावले.

नाशिक आगाराची एसटी बस (एमएच 14 बीटी 4952) सकाळी सहा वाजता नाशिकहून सोलापूरला जाण्यासाठी निघाली होती. ही बस नगरहून दुपारी बाराच्या दरम्यान पुढे निघाली. दुपारी एकच्या सुमारास ती मिरजगाव बसस्थानकापासून पाचशे मीटरवर दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आली, तेव्हा बसच्या इंजिनजवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक संतोष टोपनदारे यांच्या लक्षात आले. इंजिनकडील बाजूने धूर निघत असल्याचेही त्यांना दिसले. त्यांनी तातडीने बस थांबविली. तपासणी करताना बॅटरीमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्याच वेळी इंजिनच्या बाजूने बसने अचानक पेट घेतला. त्या वेळी चालक टोपनदारे आणि वाहक सांगवे यांनी सतर्कता दाखवीत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत जवळच असलेले मिरजगावचे ग्रामस्थ जमा झाले. सर्वांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरविले.

त्यानंतर काही वेळातच संपूर्ण एसटी बसने पेट घेतला. मिरजगाव ग्रामस्थांनी आजूबाजूने पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबही मागविण्यात आला. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील घटनास्थळी आले. त्यांच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. कर्जत येथील अग्निशामक बंब आल्यानंतर बसची आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस खाक झाली होती. त्या वेळी रस्त्यावर आणि परिसरात मोठी गर्दी झाली होती

मिरजगावच्या रहिवाशांनी बर्निंग एसटी बसचा थरार अनुभवलाच; शिवाय या बसची आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक जण विविध भांड्यांमधून पाणी आणून पेटत्या बसवर फेकत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र जेव्हा आगीने ऊग्र रूप धारण केले, तेव्हा त्यांचा नाइलाज झाला. सुदैवाने कोणा प्रवाशाला इजा झाली नाही, याचे समाधान मात्र गावकर्‍यांनी व्यक्त केले.

सर्वच एसटी आगारांच्या एसटी बसची अवस्था वाईट झाली आहे. अनेक गाड्या रस्त्यात बंद पडत आहेत. अनेक ठिकाणी बसला धक्का मारला जात असल्याची दृश्ये दिसत आहेत. या बसमधून चालक-वाहक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत एसटी महामंडळाने तातडीने निर्णय घेऊन जुन्या व खराब एसटी बस तत्काळ रद्द करून चांगल्या बस रस्त्यावर आणण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *