जळगावात मुकेश रमेश शिरसाठ याची पत्नीच्या कुटुंबियांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रविवारी भरदिवसा जळगाव शहरातल्या पिंपरी हुडको परिसरात कोयता आणि चॉपरने वार करून मुकेशची हत्या झाली.
तर मुकेशच्या कुटुंबातील सात जण यामध्ये जखमी झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी मुकेश आणि पूजा यांचा प्रेमविवाह झाला होता. या विवाहाला पूजाच्या कुटुंबियांचा विरोध होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुकेश शिरसाठ पिंप्राळा हुडको परिसरातल्या गाढे चौकात राहत होता. त्याने पाच वर्षांपूर्वी पूजासोबत प्रेमविवाह केला होता. पुजाच्या कुटुंबियांच्या मनात याचाच राग होता. यातूनच मुकेश शिरसाठवर पुजाच्या कुटुंबियांनी कोयता आणि चॉपरने हल्ला केला. मुकेशच्या मानेवर केलेले वार वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मुकेशला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत.
मुकेशच्या हत्येनंतर पोलिसांनी गाढे चौकात बंदोबस्त तैनात केला आहे. मुकेशवर जिथे हल्ला झाला तिथं मोठ्या प्रमाणावर रक्त पडले होते. तर चौकात या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता होती. मुकेशच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मुकेशवर हल्ल्याची संधी कधी मिळते याची वाट पाहत होते आणि तो एकटा दिसताच त्याच्यावर हल्ला केल्याचं मुकेशच्या काकांनी सांगितलं.
प्रेमविवाह केल्यानं माझ्या कुटुंबियांनी पतीची हत्या केली. पतीच्या हत्येमुळे माझ्यासह लहान मुलींचं भविष्य अंधारात गेलंय. पतीची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूजा शिरसाठ यांनी केलीय.


