बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास यंत्रणा अॅक्शनमोडमध्ये आल्या आहेत. मंगळवारी सीआयडीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर वाल्मिकचं संतोष देशमुख यांच्या हत्येशी असलेले संबंध शोधण्यासाठी सीआयडीने त्याची कोठडी मागितली आहे.दरम्यान, सीआयडीने कोर्टात संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत मोठा दावा केला आहे. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, याच कारणातून ही हत्या झाल्याचं सीआयडीनं कोर्टात सांगितलं आहे.
खरं तर, मंगळवारी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर बुधवारी सीआयडीने कराडचा ताबा घेतला. त्याला बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग तपासणे आणि त्याच्या इतर मालमत्तासंदर्भात चौकशी करायची असल्याचं नमूद केलं.
एवढंच नव्हे तर देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपींचं वाल्मीक कराडशी संभाषण झाल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं. तसेच हत्येच्या दिवशी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात मोबाइलवरून संवाद झाल्याचे सीडीआर देखील सीआयडीनं न्यायालयात सादर केल्याचीही माहिती समोर आली आहे.
याच संभाषणाचा तपास करायचा आहे, खंडणी प्रकरणात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, याच कारणातून त्यांची हत्या झाली, असं सांगत सीआयडीने वाल्मीक कराडची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण न्यायालयाने कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणात कोणत्याही आरोपीनं अद्याप वाल्मीक कराडचं नाव घेतलं नाही, असा युक्तीवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आला. यावेळी बीड मोक्का न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


