केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या जन्मदिनानिमित्त पंढरपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आठवणीतील गोपीनाथराव’ या विषयावर बोलताना भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर. व्यासपीठावर कैलास कारंडे, शंतनु दंडवते, शकुंतला नडगिरे, संजय वाईकर, श्रीरंग केळकर.
पंढरपूर Live 12 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) : स्व. गोपीनाथराव मुंढे यांचे व्यक्तीमत्त्व प्रसंगावधानी, दिलदार, प्रेमळ आणि उदार असे होते. स्व. गोपीनाथराव मुंढे यांना केंद्रापेक्षा राज्यात काम करण्याची फार इच्छा होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, हे स्वप्न घेऊन त्यांनी चार दशकाहून अधिक काळ राज्यात कार्य केले. परंतु दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही, अशी भावना भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी पंढरपूर येथे बोलताना व्यक्त केली.
पंढरपूर भाजपाच्या वतीने स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘आठवणीतील गोपीनाथराव’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर होते.
केळकर आपल्या भाषणात म्हणाल्या की, ते कधीही आपल्या कार्यकर्त्यांवर चिडत नसत. गोड बोलून काम कसे करून घ्यायचे, याची हातोटी त्यांच्याकडे होती. आमच्या घराण्याचा आणि त्यांचा पार जूना परिचय होता. मी नगरसेविका झाले. तेसुद्धा गोपीनाथरावजींच्या प्रयत्नांमुळेच. पूर्वी पक्षामध्ये महिला कशा काम करणार अशी चिंता नेते मंडळींना सतावयाची. मात्र गोपीनाथजी महिला कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, सांगलीमध्ये एकदा सत्ताधारी लोक महानगरपालिकेची जागा बळकावण्याच्या बेतात होते. यावेळी सदर जागा वाचविण्यासाठी आम्ही त्या भूखंडावर एका रात्रीत मंदिर उभे केले. मात्र विरोधकांनी याला जातीय स्वरूप देऊन दंगा माजविण्याचा प्रयत्न केला.
मंदिर काढण्यासाठी प्रशासनाचे लोक येणार अशी खबर लागताच मी मुंढे साहेबांना तुम्ही येथे यावे, असे सूचविले. तेव्हा मुंढे साहेब अत्यंत शांतपणे म्हणाले की, मी यायची काही गरज नाही. मंदिर काढले तर मी स्वत: सांगली येथे येऊन उपोषण करीन. आमचे लोक रात्रंदिवस मंदिराभोवती पहारा द्यायचे. त्यामुळे मंदिर अजूनही तसेच राहिले आहे. अशाप्रकारे आम्ही सांगलीतील अनेक भूखंड वाचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो, हे केवळ गोपीनाथरावजींच्या मार्गदर्शनामुळेच.
महिलांच्या 33 टक्के आरक्षणासाठी आम्ही मुंढेंकडे मागणी करायचो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने महिला कार्यकर्त्यांना दूर ठेवले होते. परंतु मुंढे साहेबांच्या विनंतीमुळे पुढे योग्य तो मान सन्मान सर्व महिला कार्यकर्त्यांना देण्यात आला.
ते अत्यंत कुटूंबवत्सल होते. परिचयातील कुटूंबातील मुलांची नावेसुद्धा त्यांना माहित असत. माझ्या मुलाचा खूप मोठा अपघात झाला तेव्हा त्यांच्या मदतीनेच तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.
त्यांच्याकडे विविध कामांसाठी रोज हजारो माणसे यायची. परंतु ही माणसे कधीही विन्मुख परत आली नाहीत. उपमुख्यमंत्री असतानाही ज्येष्ठ नेत्यांचा मान सन्मान ठेवणे हे ते कधीही विसरत नसत. 18 साखर कारखाने ते चालवायचे. व्यवसाय, कुटूंब व पक्ष चालविणे सोपे नाही. मात्र स्व. मुंढेसाहेबांनी हेसुद्धा करून दाखविले.
केंद्रीय ग्रामविकासमंत्री असताना त्यांना राज्यात काम करायचे होते, त्यासाठी हे मंत्रीपद सोडून ते महाराष्ट्रात येऊन काम करण्याच्या विचारात होते. बीडमध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यादरम्यान कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले की, मला केंद्रापेक्षा राज्यात काम करायला आवडेल. माझा तसा प्रयत्नही चालू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे हे माझे स्वप्न आहे, असे ते म्हणाले होते. पण तो दूरध्वनी त्यांचा अखेरचा ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
केळकर यांनी आपल्या भाषणात गोपीनाथराव मुंढे यांच्या कार्य पद्धतीचा व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षीय कार्य वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा धावता आढावा घेतला. गोपीनाथ मुंढे यांची आज पदोपदी आठवण होते, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाईकर यांनी केले. सूत्रसंचालन कैलास कारंडे यांनी केले. स्वागत शंतनु दंडवते यांनी केले. आभार शकुंतला नडगिरे यांनी मानले. यावेळी नीता केळकर यांचा सुप्रिया वाईकर, शकुंतला नडगिरे, अपर्णा तारके, रेखा कुलकर्णी यांनी सत्कार केला. या कार्यक्रमास श्रीरंग केळकर, वि. मा. मिरासदार, शाम तापडिया, जगदीश डांगे, आनंद नगरकर, दत्तासिंह राजपूत, उमेश वाघोलीकर, सुरेंद्र कवठेकर, संदीप कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, सौदागर मोळक, अनिल शिंदे, कांतीलाल सुपेकर, श्रीराम बडवे, मालती वाईकर, अपर्णा तारके, पूजा बोरामणीकर, हर्षदा नगरकर, त्र्यंबक महाजन-बडवे, प्रसाद आटपाडीकर, आण्णा धोत्रे, संतोष जाधव, श्रीनिवास खाबाणे, नितीन करंडे, डॉ. प्राजक्ता बेणारे, बंटी लव्हेकर, ओंकार जोशी, पार्थ बेणारे, बालाजी गडम, रेखा कुलकर्णी, अजय जाधव, मुकुंद देवधर, सौरभ थिटे, रूपाली यलगम, शशिकांत सुगंधी, दशरथ काळे, नितीन धोत्रे, राम चौगुले, अश्पाक नदाफ, नगरसेवक अनिल अभंगराव, देवयानी दामोदरे यांच्यासह रखुमाई क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








