👁 7 Views

धक्कादायक: नातेवाईक महिलेवर केला अत्याचार… अन् दाम्पत्याला संपवले , आरोपी अटकेत

 

पिंपरी : दापोडी येथील दाम्पत्याच्या खुनाची घटना आरोपी तरुणाच्या नातेवाईक महिलेवर अत्याचार केल्याच्या सूडातून घडल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर (वय ३२, रा. खेड मक्ता, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, सध्या- दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे. तर मारुती नारायण काटे (वय ६०), संगीता मारुती काटे (वय ४६, दोघेही रा. महादेव आळी, दापोडी गावठाण) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेली माहिती अशी, काटे यांच्या सहा खोल्या भाड्याने असून प्रसन्ना हा २०१५ ते २०१७ या कालावधीत त्याच्या नातेवाईक महिलेसह येथे रहायला होता. तो खासगी नोकरी करायचा तर त्याची नातेवाईक गृहिणी होती.

दरम्यान, मारुती यांनी नातेवाईक महिलेवर अत्याचार केल्याचा तसेच त्यांना संगीता यांनी मदत केल्याचा आरोपीचा समज होता. याचा राग त्याच्या डोक्यात होता. दरम्यान, आरोपी व त्याचे नातेवाईक येथील खोली सोडून ते तळेगाव दाभाडे येथे रहायला गेले. २०१९ मध्ये त्याच्या नातेवाईक महिलेचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर आरोपी यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला. मात्र, अत्याचाराचा बदला घेण्याचे त्याच्या डोक्यात होते.

या सूडाच्या भावनेतून त्याने शनिवारी (ता. ११) दापोडी गाठले. येतानाच नवीन टिकाव खरेदी केला. काटे यांच्या घरात शिरला असताना काटे दाम्पत्य घरातच होते. मारुती व संगीता यांच्या डोक्यात, मानेवर व पाठीवर टिकावने घाव घातले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी काटे यांचा मुलगा बाहेर गेलेला होता.


खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेले हात घेऊन घराबाहेर पडला. काहीतरी बरळत स्वतःचा पोलिस चौकीत निघाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांना कळविले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *