सांगली: शहरातील जुना बुधगाव रोडवरील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड चोरीला गेली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी घरकाम करणाऱया महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
वंदना दादासाहेब पुणेकर असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आमीर अप्पासाहेब लांडगे (वय 80, रा. पंचशीलनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सांगली शहरातील जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगरमध्ये दुर्गामाता मंदिरासमोर आमीर लांडगे राहतात. त्यांच्याकडे घरकामासाठी वंदना पुणेकर ही महिला येत होती.
7 ते 8 डिसेंबर 2022दरम्यान आमीर लांडगे झोपलेले असताना वंदनाने सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आणि रोक रक्कम चोरून पलायन केले. याप्रकरणी एकूण एक लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद लांडगे यांनी संजयनगर पोलिसांत दिली आहे.
वंदना कुठे राहत होती, हेही लांडगे यांना माहीत नव्हते. ती त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करण्यासाठी येत होती, अशी माहिती संजयनगर पोलिसांनी दिली आहे.



