रॅम्पअभावी भाविकांचे हाल

Loading

           पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी हजारो अपंग आणि वृध्द भाविक येतात त्यांना मंदिराच्या पायर्‍या चढून जाणे शक्य होत नाही तरीदेखील मंदिर समितीने त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था केली नाही त्यामुळे अपंग आणि वृध्द भाविकांचे हाल होत आहेत, अशी तक्रार अखिल भारतीय वारकरी सेनेच्या वतीने मंदिर समितीकडे करण्यात आली.

                विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी होत असलेल्या गैरसोयीविषयी वारकरी सेनेच्या वतीने आज तक्रारी करण्यात आल्या. त्याबाबतची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अ.भा. वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते, उमेशशिंदे, नवनीत गोरले, अनिल पवार उपस्थित होते.
गायकर म्हणाले की, ‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती ही राज्य शासनाच्या विधी व न्याय खात्यांतर्गत असलेली शासकीय समिती आहे. शासनाच्या वतीने सर्व सार्वजनिक संस्थांचे कार्यालय, शाळा आदी ठिकाणी अपंग मुलांसाठी रॅम्प असण्याचा कायदा केला आहे; मात्र मंदिर समितीमध्ये स्वत: मात्र रॅम्प केला नाही त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ अशी झाली आहे. 

मंदिर समितीच्या वतीने वेदांत आणि व्हिडीओकॉन अशी दोन भक्त निवास बांधण्यात आली आहेत मात्र त्याचे दरही एखाद्या मोठय़ा हॉटेलप्रमाणे असल्याने सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या भक्तांना ते घेणे शक्य होत नाही; मात्र ज्यांच्या आवाक्यात आहे अशा भक्तांनाही दरापेक्षा अधिक पैसे दिल्याशिवाय किंवा वशीला आणल्याशिवाय येथे खोल्या मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली.
पोलीस अधिकार्‍यांसाठी रखुमाई सभागृह नावाचे भव्य विश्रामगृह बांधण्यात आले आहे; मात्र तरीदेखील बहुतांश पोलिसांना मंदिर समितीचे भक्तनिवास राहण्यासाठी दिले जाते. त्यामुळे सामान्य वारकर्‍यांना राहण्यासाठी खासगी हॉटेल्स, लॉज आणि मठाचा शोध घ्यावा लागतो.
■ अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते पंढरपुरात आले होते. ते दर्शनासाठी मंदिरात आले होते त्यावेळी त्यांना पायाच्या दुखापतीमुळे एक फुटापेक्षा जास्त उंच पाय उचलणे शक्य नव्हते म्हणून मंदिर समितीने त्यावेळी तातडीने लाकडी रॅम्प बनविला होता. त्या रॅम्पवरूनच वाजपेयी मंदिरात गेले; मात्र त्यानंतर मंदिर समितीने तो रॅम्प लागलीच काढून टाकला त्यानंतर आजतागायत मंदिरात कोठेच आणि कोणासाठीच रॅम्प लावण्यात आला नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *