नूह जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीये.
दोन मुस्लिमांना जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या श्रीकांतच्या गर्भवती पत्नीला राजस्थान पोलिसांनी बेदम मारहाण केलीये.
ही महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. मारहाणीमुळं तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झालाय. राजस्थान पोलिसांनी आरोपी श्रीकांतच्या नूह जिल्ह्यातील घरावर छापा टाकला होता.
श्रीकांतच्या कुटुंबीयांच्या आरोपावर राजस्थान पोलिसांकडून कोणतंही मत व्यक्त करण्यात आलेलं नाही. हरियाणा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. श्रीकांतची आई दुलारी यांनी शनिवारी नूह जिल्ह्यातील नगीना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.
दुलारींनी सांगितलं की, 16 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता राजस्थान पोलिसांचे 30-40 लोक आमच्या घरी आले. कुटुंबीयांना धमकावून त्यांनी जबरदस्तीनं घराचं दार उघडलं. घरात शिरत श्रीकांतची चौकशी करू लागले. श्रीकांत घरी नसल्याचं आम्ही पोलिसांना सांगितलं. हे ऐकून पोलिस चांगलेच संतापले.
त्यांनी घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. कुटुंबातील लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, श्रीकांतची गर्भवती पत्नी कमलेश एका खोलीत होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी तिलाही सोडलं नाही. त्यांनी कमलेशला कॉटवरून ढकलून मारहाण केली.
मारहाण झाल्यामुळं गर्भवती कमलेशला पोटात दुखू लागलं. ती वेदनेनं कोसळली. तिची प्रकृती ढासळत असल्याचं पाहून त्यांनी तात्काळ जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, मंडीखेडा इथं नेलं. मात्र, सुनेची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून तिला नल्हार वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आलं. गरोदर कमलेशची प्रकृती खालावतच राहिली. कमलेश आणि न जन्मलेल्या बाळाला असलेला धोका पाहून डॉक्टरांनी 18 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया केली. ऑपरेशननंतर बाळाचा जन्म मृत झाला होता. नवजात बालकाच्या तोंडातून रक्त येत होतं आणि नाडी बंद झाली होती. तर, माझी सून अजूनही गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल आहे, असं दुलारींनी सांगितलं.



