पिंपरी-चिंचवड—आगळे-वेगळे साहित्य संमेलन

Loading

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चार दिवसांनी पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत अतिशय उत्साहात सुरू होत आहे. हा औद्योगिक परिसर असला तरी संतांच्या परमस्पर्शाने अतिशय पुनीत झालेला हा परिसर आहे. उजव्या हाताला आळंदीला ज्ञानोबा आहेत. डाव्या हाताला देहूत तुकोबा आहेत. १२००व्या शतकातले ज्ञानोबा आणि १६००व्या शतकातले तुकोबा. मध्ये ४०० वर्षाचे अंतर. पण १२००व्या शतकातल्या ज्ञानोबाशी १६००व्या शतकातले तुकोबा जोडले गेले. ज्ञानेश्वर मराठी भाषेचा पाया ठरले. तुकोबांनी कळस चढवला. म्हणून ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. कळस झळके वरी तुक्याचा..’ हे मराठी मनाचे घोषवाक्य ठरले.
त्या ज्ञानोबा-तुकोबाच्या परिसरात-पिंपरी-चिंचवड भागात ८९व्या मराठी साहित्य संमेलनाचा गजर सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आगळे-वेगळे आहे. किंबहुना बोधचिन्हापासूनच साहित्य संमेलनाच्या आगळया-वेगळयापणाला सुरुवात झाली असे म्हणायला हवे. ‘म’ मराठीतला. तो ज्या बोरूने कागदावर रेखाटायचा तो बोरू सामान्य माणसाच्या हातातला.
सर्वसामान्य माणसे त्या काळात अशाच बोरूने दौतीत तो बोरू किंवा काही काळानंतरचा टाक बुडवून शब्दांना साकार करीत होती. एखादा ज्ञानेश्वर किंवा एखादा तुकाराम इंद्रायणीत टाक बुडवून त्याने आपले काव्य शब्दबद्ध केले. सामान्य माणसाच्या हातात हजार वर्षापूर्वी जो बोरू होता, तेच खरे मराठी भाषेचे बोधचिन्ह आहे आणि तेच बोधचिन्ह पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनात शिरोभागी आहे.
मराठी साहित्य संमेलन आणि त्यात वाद झाला नाही, असे संमेलन शोधून काढावे लागेल. कारण ज्ञानवंतांना, बुद्धिवंतांना वाद हे जिवंतपणाचे लक्षण वाटते म्हणून असेल, प्रत्येक साहित्य संमेलनात आवश्यक, अनावश्यक असे सगळया प्रकारचे वाद होतात आणि हे वाद भांडणात कधी रूपांतरीत झाले हे कळत सुद्धा नाही. हे साहित्य संमेलनही त्याला अपवाद ठरेल तर ती आनंदाची गोष्ट होईल.
प्रत्यक्ष संमेलनात वाद होऊ नये. गेल्या काही दिवसांत बाहेर जे वाद झाले आणि ते पराकोटीला गेले तेवढे पुरेसे आहे. हे सगळयांनी समजून घेतले तर मराठी भाषेवर उपकार होतील. अर्थात शेवटी व्यक्ती व्यक्तींवर ब-याच गोष्टी अवलंबून असतात. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रसाद दत्तात्रेय पाटील ऊर्फ पी. डी. पाटील यांनी ज्या मनस्वीपणाने या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आणि त्याचे स्वरूप वादविवादाच्या पलीकडे नेले.
शिवाय गेले चार महिने त्यांनी असे वातावरण तयार केले की, संमेलन हा एक मराठीचा महोत्सव ठरावा. आणि यात केवळ ज्येष्ठ लेखक, साहित्यिक किंवा काही राजकारणी यांच्यापुरता हा उत्सव नसून या वर्षीच्या साहित्य संमेलनात सर्वार्थाने हे संमेलन अस्सल वाचकांचे संमेलन, रसिकांचे संमेलन होणार आहे. हे एका दिवसात घडलेले नाही. पिंपरी-चिंचवड परिसरात डी. वाय. पाटील विद्यापीठ संकुलाचे प्रमुख म्हणून डॉ. पी. डी. पाटील यांनी गेली ३५ वर्षे एका इंजिनीअरिंग कॉलेजमधून १५ अद्ययावत संस्था उभ्या केल्या. त्यामुळे या उद्योग नगरीला अद्ययावत शिक्षण नगरीचे स्वरूप प्राप्त झाले. इथे इंजिनीअरिंग कॉलेज आहे. ते देशातल्या नामवंत कॉलेजपैकी आहे. इथे वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेही नामवंत आहे.
१६०० खाटांची व्यवस्था आज सरकारी रुग्णालयात सुद्धा असू शकत नाही आणि जिथे कुठे काही प्रमाणात अशी मोठी सेवा असेल तिथे सुविधा काही नसतात. केईएम रुग्णालयावर नजर टाकली तरी हे आपल्याला दिसू शकेल. डॉ. पी. डी. पाटील यांनी जे १६०० खाटांचे रुग्णालय उभे केले, त्या संकुलात शस्त्रक्रिया संकुले ही अद्ययावत आहेत.
रुग्णांच्या खोल्या अद्ययावत आहेत. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जी टापटीप असेल, ती टापटीप पिंपरी-चिंचवड आरोग्य संकुलात पाहायला मिळेल. हवेशीर रुंद खोल्या, उत्तम पडदे, उत्तम रुग्णसेवा, अत्यवस्थ माणसाची सेवा करणारा एक नातेवाईक, त्याला राहण्याची मोफत व्यवस्था आणि मोफत भोजन, कोणत्याही उपचाराचे पाच पैसे घेतले जात नाहीत.
दुपारचे, रात्रीचे भोजन मोफत, औषधोपचार मोफत, शस्त्रक्रिया मोफत.. आज जे कोणाला विश्वसनीय वाटणार नाही. ते शब्दांच्या पलीकडचे सत्यामध्ये उतरवण्याची किमया अत्यंत निर्गवी असलेल्या डॉ. पी. डी. पाटील यांनी साध्य करून दाखवली. या शिक्षण यज्ञातून जे विद्यार्थी तयार होत आहेत, ते उद्याचे शास्त्रज्ञ असतील, उद्याचे डॉक्टर असतील, इंजिनीअर असतील, वकील असतील, दंतचिकित्सक असतील, आयुर्वेदाचार्य असतील, व्यवस्थापकीय सल्लागार असतील.
देशाच्या उभारणीत या सर्वाचा फार मोठा वाटा राहणार आहे. असे अतिशय मोठे निर्णायक काम करणा-या डॉ. पी. डी. पाटील यांना मराठी साहित्य परिषदेने ८९ वे साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडसाठी दिले, हे साहित्यावर उपकार आहेत. त्यामुळे उद्याचे संमेलन आजवरच्या संमेलनात काही वेगळे करून जाणार आहे. आणि हे वेगळेपण केवळ उत्तम न्याहारी, उत्तम भोजन, उत्तम निवास व्यवस्था, उत्तम मंडप, उत्तम सजावट एवढयापुरतेच उत्तम शब्दाभोवती फिरणार नसून काही मूलभूत गोष्टी या स्वागताध्यक्षांनी नव्याने सुरू केल्या आहेत.
आजपर्यंतच्या साहित्य संमेलनात अध्यक्षांची एक भूमिका असते. स्वागताध्यक्षांची एक भूमिका असते. स्वागताध्यक्षांकडून अपेक्षा एवढीच की त्यांनी व्यवस्था उत्तम ठेवावी. आणि रसिकांचे स्वागत म्हणून स्वागताध्यक्षांचे भाषण करावे. मग त्या भूमिकेचा विषय संपला. आतापर्यंत झालेल्या ८८ साहित्य संमेलनातील अध्यक्ष त्यांच्या वर्षाच्या कारकिर्दीनंतर जसे फारसे लक्षात राहात नाहीत, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष तर अजिबात लक्षात राहात नाहीत. त्यामुळे ‘उत्तम व्यवस्था’ एवढया एकाच निकषावर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांचे मूल्यमापन होते. या साहित्य संमेलनात डॉ. पी. डी. पाटील यांनी एक आगळी-वेगळी दिशा देऊन टाकली. त्यामुळे हे संमेलन केवळ पिंपरी-चिंचवडचे न ठरता संपूर्ण महाराष्ट्राचे झाले आहे.
पी. डी. यांनी अशी कल्पना मांडली की स्वागताध्यक्षाने मंडपात स्वागत करणारे भाषण करण्यापेक्षा काही वेगळे करू या. आणि त्यातून कल्पना पुढे आली की, महाराष्ट्राच्या प्रामुख्याने पाच विभागांत जाऊन तेथील साहित्यिकांना भेटावे. त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना साहित्य संमेलनाची निमंत्रणे द्यावीत. त्या त्या विभागातील साहित्याचे प्रश्न समजून घ्यावेत. एका अर्थाने पी. डी. पाटील यांची ही कल्पना म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची नवीन नांदी ठरली.
पहिला दौरा झाला नागपूरचा. विदर्भ साहित्य संघ संस्थेला भेट झाली. त्या साहित्य संघाने आपला पसारा केवढा मोठा वाढवला. मनोहर म्हैसाळकर भेटले. सायंकाळच्या कार्यक्रमात विदर्भातल्या नामवंत साहित्यिकांची चर्चा झाली. गिरीश गांधी यांनी पुढाकार घेतला. यशवंत मनोहर, प्राचार्य वि. स. जोग, श्रीपाद भालचंद्र जोशी अशी नागपूरमधली नामवंत मंडळी किमान दीडशेपर्यंत उपस्थित होती. त्यांना या उपक्रमाचेच कौतुक वाटले.
पश्चिम महाराष्ट्रातल्या एका शिक्षण संस्थेचा प्रमुख, स्वागताध्यक्ष होऊन विदर्भातल्या साहित्यिकांना आमंत्रण द्यायला येतो, याचे सगळयांना अप्रूप होते. मराठवाडयात तीच भावना होती. गंगाधर पानतावणेसर, रा. रं. बोराडेसर, यु. म. पठाणसर, कौतिकराव ढाले-पाटील अशांच्या घरी स्वागताध्यक्ष जाऊन आमंत्रण देतील अशी कोणी कल्पना केली नव्हती. चिपळूण, कणकवली, कोकणातही त्या परिसरातील शे-दोनशे साहित्यिकांशी परिसंवाद झाला.
कणकवलीत तर प्रहारच्या विवेकानंद सभागृहात तीनशेपेक्षा जास्त कोकणातील रसिक आणि साहित्यिक उपस्थित होते. स्वत: श्री. नारायणराव राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला. मालवणी भाषेतल्या अनेक साहित्यिकांची भेट झाली. या सगळयांचा एक चांगला परिणाम असा झाला की, हे संमेलन महाराष्ट्राचे संमेलन आहे अशी भावना निर्माण झाली आहे आणि त्याला कारण पी. डी. पाटील यांची व्यापक भूमिका.
संमेलनाचे आणखी वैशिष्टय़ असे आहे की, आतापर्यंत साहित्य संमेलनात संमेलनाच्या माजी अध्यक्षाला कोणी बोलावलेले नव्हते. हे पहिले संमेलन असे होत आहे की मुळात ते तीनऐवजी चार दिवसांचे आहे. आणि पहिल्या दिवशी सगळया माजी साहित्यिकांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. ‘माजी अध्यक्ष-आजी संमेलन’ असा त्यांना विषय दिला आहे. या कार्यक्रमाचेही फार मोठे अप्रूप वाटत आहे.
यानिमित्ताने मारुती चितमपल्ली, द. भि. कुळकर्णी, नागनाथ कोतापल्ले, अरुण साधू, फ. मुं. शिंदे, विजया राजाध्यक्ष अशी सगळी आजी-माजी अध्यक्ष मंडळी यानिमित्ताने एकत्र भेटतील आणि त्यांची चर्चा हा सुद्धा केवढा मोठा आनंदाचा भाग असेल.
या देशातल्या ६५ ज्ञानपीठ विजेत्यांपैकी दहा ज्ञानपीठ विजेते पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनात उपस्थित राहणार आहेत आणि ते सर्व भाषिक आहेत. त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्या निमित्ताने एक नवा ठेवा कायमचा संग्रहात राहील. आजपर्यंत असा उपक्रम झाला नव्हता. मराठीत ज्ञानपीठ मिळवणारे भाऊसाहेब खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज आता नाहीत. त्या तोलामोलाचे पाडगावकरही गेले. तरीसुद्धा अन्य भाषेतल्या ज्ञानपीठ विजेत्यांना ऐकणे, पाहणे, बोलणे हेही मराठी भाषेची कूस समृद्ध करण्याकरिता अतिशय उपकारकच ठरेल.
प्रख्यात कवी आणि दिग्दर्शक गुलजार हे उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे आहेत. उद्घाटन श्री. शरद पवार यांच्या हस्ते आहे. शरद पवार राजकारणी असले तरी साहित्याच्या व्यासपीठावर साहित्यातून कोणता विचार द्यावा, हे अधिकारवाणीने सांगणारे ते एक प्रकारचे विश्लेषक आहेत. बारामतीच्या नाटय़संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून भाषण करताना, नाटय़ परिषदेच्या अध्यक्षाला मराठी रंगभूमीचा जो इतिहास माहीत नव्हता, तो इतिहास शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितला तेव्हा सभामंडपातील सारे रसिक थक्क झाले होते. महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यासपीठावर अतिशय सशक्तपणे वावरू शकतील आणि अधिकाराने बोलू शकतील, असे नाव शोधायचे म्हटले तर आज शरद पवार यांच्याशीच येऊन थांबावे लागते.
या साहित्य संमेलनात संवाद, परिसंवाद, काव्यसंमेलने यांची रेलचेल आहे. चार मंडप स्वतंत्र आहेत. ग्रंथ विक्रीकरिता पाचशे स्टॉल आहेत. चारही दिवस या पुस्तक विक्रीच्या मंडपात ‘लेखक वाचकांच्या भेटीला’ या उपक्रमात विविध लेखकांना भेटण्याची संधी आणि चर्चा करण्याची संधी वाचकांना मिळेल.
समारोपाला जावेद अख्तर आहेत. सुसंस्कृत वक्तृत्वाचा एक मोठा नमुना अनुभवता येईल आणि १६ तारखेला रात्री आशा भोसले नाटय़ संगीत रंगवतील. आणि सुरेश भटांचे शब्द ‘केव्हा तरी पहाटे निसटून रात्र गेली’ या हुरहूर लावणा-या गाण्याने रात्री उशिरा आशाताईंची मैफल संपेल.
संमेलनाचे चार दिवस असे भरगच्च आहेत. अशोक हांडे यांच्या ‘मंगल गाणी-दंगल गाणी’ने समारोप झाल्यावर १८ जानेवारीची रात्र अशीच हुरहूर लावून जाईल. चार दिवसांचे संमेलन अजून हवे होते, असे वाटेल. आणि म्हणून हे संमेलन अपूर्व ठरणार आहे.
संमेलनात येणा-या प्रतिनिधींचे जे भोजन शुल्क जमा होईल, त्यात भर घालून सत्तर लाख रुपयांचा निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘नाम’ या संस्थेला साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी चेकरूपाने समर्पित केला जाईल.
महाराष्ट्रातील जी सार्वजनिक वाचनालये शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षे काम करीत आहेत, त्या वाचनालयातील जुन्या जीर्ण पुस्तकांची देखभाल आणि पुनर्बाधणी करण्याकरिता त्या प्रत्येक वाचनालयाला दोन लाख रुपयांचा निधी संमेलनात शेवटच्या दिवशी त्या त्या ग्रंथपालांकडे दिला जाईल.
महाराष्ट्र शासनाने साहित्य संमेलनाकरिता दिलेला पंचवीस लक्ष रुपयांच्या निधीचा चेक परत करून हाच निधी महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतक-यांना साहित्य संमेलनातर्फे मुख्यमंत्री निधीकरिता दिला जाईल.
मराठीचा प्रसार आणि प्रचार याकरिता २०१६ ते २०१७ या काळात महाराष्ट्रात विविध दौरे करण्याकरिता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांना पाच लाख, साहित्य संमेलनाचे सध्याचे अध्यक्ष सदानंद मोरे यांना पाच लाख आणि नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना पाच लाख रुपयांचा निधी संमेलनात दिला जाईल.
मराठी साहित्य संमेलनात तीन संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन होईल. त्यातला एक ग्रंथ पत्रकार विजय कुवळेकर यांनी संपादित केलेला आहे. अन्य दोन पुस्तकांमधील ६५ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची माहिती आणि छायाचित्रे तसेच दुस-या पुस्तिकेत ८९ वे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रे आणि माहिती दिली आहे. त्याचे प्रकाशन याच संमेलनात होईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *