पंढरीत रंगली सारे गमप च्या कलाकारांची संगीत मैफील

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी):- 

पंढरीत काल दि. 19 जानेवारी 2016 रोजी सारेगमप चे कलाकार सावनी रविंद्र (पुणे) व जयंत पानसरे (सोलापूर) यांची संगीत मैफील पंढरीतील तुकाराम भवन येथे रंगली होती. या संगीत मैफलीचा आस्वाद घेणेसाठी संगीत रसिकांच्या गर्दीने तुकाराम भवन भरगच्च भरले होते. या कार्यक्रमास भागवताचार्य वा.ना. उत्पात व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

रामकृष्ण हरी चा गजर व सुंदर ते ध्यान या अभंगाने सावनी रविंद्र यांनी आपल्या सुमधुर आवाजाने मैफीलीची सुरुवात करत रसिकांची मने जिंकली. कमोदिनी काय जाणीजेे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, थकले रे नंदलाला, रुणु-झुणु रुणु-झुणु, आदीमाया अंबाबाई अशी एकापाठोपाठ गीते आपल्या सुरेल आवाजात गाऊन कार्यक्रमामध्ये अधिकच रंगत आणली.

सोलापूर येथील जयंत पानसरे यानी त्यांच्या भारदस्त आवाजामध्ये गणनायकाय गजमुखाय, कानडा राजा पंढरीचा, आकाशी झेप घे रे पाखरा, झाला महार पंढरीनाथ, आई भवानी तुझ्या कृपेने अशी एका एक सुमधुर गीते सादर करत रसिकांना खिळवून ठेवले. सदर कार्यक्रमास लाभलेली सुशिल कुलकर्णी (खर्डीकर) यांची तबल्याची साथ वैशिष्ट्येपुर्ण व पंढरपूरकरांसाठी संस्मरणीय ठरली.
तर पंढरपूरच्या भारत वाघुले यांनी हार्मोनियमची दिलेली मधुर साथ, करकंबच्या ओंकार जोशी यांनी लयबध्द अशी पखवाजाची दिलेली साथ यामुळे हा कार्यक्रम बहारदार झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद कुलकर्णी (मेथवडेकर) व श्रीकांत कुलकर्णी (खर्डीकर) यांनी करुन पंढरपूरच्या
रसिकांना संगीताची अनमोल मेजवानी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *