12 वीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये

मुंबई: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे. कारण बारावीच्या नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांचीही जुलै महिन्यातच परीक्षा घेण्यात येणार आहे.
यापूर्वी दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरिता नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली होती. त्याचपद्धतीने आता २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय तावडेंनी घेतला आहे.
या निर्णयामुळे १२ वीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी तातडीने मिळणार आहे.
गेल्या वर्षी १० वी परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत आयोजित करून त्याचा निकाल २५ ऑगस्ट, २०१५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या फेरपरीक्षेमध्ये ५७,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाण्यापासून वाचलं होतं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *