नीरजा भानोत : दहशतवाद्यांशी दोन हात करणारी वीरांगना

Loading

मुंबई : 7 सप्टेंबर 1963… चंदीगढ इथे राहणाऱ्या भानोत कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच नीरजाला खेळण्या-बागडण्याच्या वयात आकाश खुणावत होतं. भातुकली-बाहुलीच्या जागी आकाशात मुक्त संचार करणारी विमानं तिला दिसायची. नीरजाच्या इच्छेप्रमाणे घरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. नीरजाने फ्लाइट अटेन्डण्टचं तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन 16 जानेवारी 1986मध्ये एअरलाईन्स पॅन अॅम जॉईन केलं.
 
5 सप्टेंबर 1986… मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झालेल्या पॅन एम 73  या विमानाचं चार दहशतवाद्यांनी कराचीमध्ये अपहरण केलं आणि सर्व प्रवाशांना ओलिस ठेवलं. याच विमानात नीरजा सीनिअर फ्लाईट अटेण्डन्ट म्हणून काम पाहत होती.  17 तासांच्या या थरारनाट्यानंतर या दहशतवाद्यांनी प्रवाशांची हत्या करायला सुरुवात केली. पिरस्थिती आवाक्याबाहेर जात आहे, याचा अंदाज येताच नीरजाने प्रसंगावधान राखत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांची सुटका केली.                                          
खरंतर हा दरवाजा उघडताच नीरजा स्वत:ची सुटका करुन घेऊ शकली असती पण तसं न करता तिने प्रवाशांना या संकटातून बाहेर काढलं. तीन लहानग्यांना या विमानातून बाहेर काढत असताना जेव्हा दहशतवाद्यांना याची कुणकुण लागली तेव्हा त्यांनी या मुलांवर गोळी चालवली. मात्र नीरजाने मध्ये पडत ही गोळी आपल्या अंगावर झेलली आणि या मुलांची सुटका केली. याच चकमकीमध्ये नीरजाचा मृत्यू झाला. भानोतांच्या लाडक्या लाडोने या जगाचा निरोप घेतला होता.
 
23 वर्षीय नीरजाला मरणोत्तर अशोकचक्र प्रदान केलं. देशाचा सर्वोच्च शौर्य सन्मान मिळवणारी निरजा ही सर्वात लहान भारतीय आणि पहिली महिला आहेनीरजाची ही शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर साकारणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याप्रमाणे होतं. पण राम माधवानींनी हे आव्हान स्वीकारलं आणि सुरु झाली सिनेमाची जुळवाजुळव. प्रश्न होता तो नीरजाची व्यक्तिरेखा कोण साकारणार? अनेक नायिकांची नाव राम माधवानींना सुचवण्यात आली पण नीरजाच्या भूमिकेसाठी त्यांच्या डोक्यात होतं ते सोनम कपूरचं नाव. सोनमच या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकते याच विश्वासातून सोनमच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि सिनेमाची टीम पुढच्या तयारीला लागली.
विमान अपहरणाचं संपूर्ण नाट्य विमानातच घडलं असल्यामुळे शूटिंगही विमानातच करावं लागणार होतं. खऱ्याखुऱ्या विमानात शूटिंग करायला मर्यादा येत असल्यामुळे मग या टीमने विमानाची हुबेहुब प्रतिकृती बनवण्याचा निर्णय घेतला आणि हा हा म्हणता 48 दिवसाचं खरंखुरं भासणारं विमान सज्जही झालं.
 
नीरजाचं शूटिंग म्हणजे प्रत्येकासाठीच जीवन समृद्ध करणारा अनुभव होता. दिवसभराचं 18-18 तासांचं दगदगीचं शूटिंग पूर्ण केल्यानंतरही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. न थकता नव्या जोमाने ही टीम कामाला लागायची. या सिनेमाच्या सेटवर इतर अनेक कलाकारांनीही भेट दिली आणि संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणीत केला.सोनम कपूरसाठी तर नीरजा सिनेमा खूपच स्पेशल आहे. आयुष्याच्या या वळणावर अशी भूमिका साकारायला मिळाल्याचा तिला आनंद आहे. शूटिंग दरम्यान नीरजाने चंदीगढला जाऊन नीरजाच्या कुटुंबाची भेटही घेतली होती. तू तर माझ्या लाडोसारखी आहेस, असं नीरजाची आई म्हणाली.  यावेळी त्यांच्या अंगावर आलेला रोमांच मी अनुभवला. माझ्यासाठी तो क्षण अतिशय सुंदर होता. हा सिनेमा म्हणजे मोठी जबाबदारी असल्याचं मला जावणलं, असं सोनम कपूर म्हणाली.
सिनेमातून उलगडणारी नीरजा भानोतची ही शौर्यगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल याचा विश्वास या टीमला वाटत आहे. त्यामुळे हा फक्त सिनेमा नसून ही श्रद्धांजली असेल नीरजा भानोत या वीरांगनेला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *