नाशिक – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले नायक शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजता चांदवड तालुक्यातल्या भायळे या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं.
शनिवारी कुपवाडयात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल 18 तास चाललेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. तर, दोन जवान शहीद झाले. त्यात भायळे इथल्या शंकर शिंदे आणि कर्नाटकच्या विजापूर इथल्या सहदेव मोरे या जवानांचा समावेश होता. रविवारी सायंकाळी शंकर यांचं पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आलं. नंतर देवळाली कॅम्प येथे लष्करी अधिकार्यांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले. शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांना अखेरचा सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक भायळे इथे मोठया संख्येने उपस्थित होते. शंकर शिंदे अमर रहेच्या घोषणा देत उपस्थित नागरिकांनी आपल्या शूर वीराला निरोप दिला.
आज सकाळी वीरजवान शंकर शिंदे यांचा दीडवर्षाचा मुलगा ओम याने हे अंत्यसंस्कार केले. शहीद शंकर यांची सहा वर्षाची कन्या वैष्णवी वडील आज येणार म्हणून वाट पाहत होती. पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर वीर जवानाच्या वीर पत्नी सह मुलांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.




