भारतीय-चीन सीमारेषेवर संशयास्पद हालचाल

नवी दिल्ली – भारत व चीनमधील प्रत्यक्ष ताबारेषेनजीक असलेल्या भारतीय
हद्दीमधील एका गावामधील सरपंच व इतर गावकऱ्यांना पाकिस्तान; वा चीनमधील
“गुप्तहेरां‘चे भारतीय लष्करविषयक माहिती विचारणारे दुरध्वनी आल्यानंतर
येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. दुरध्वनी करणाऱ्याने
आपण स्थानिक अधिकारी वा लष्करी अधिकारी असल्याचे सांगत या भागामधील
लष्कराची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.

समुद्रसपाटीपासून
सुमारे साडेतेरा हजार फूट उंचीवर असलेल्या दुर्बुक गावाच्या सरपंचास अशा
स्वरुपाचा दुरध्वनी आल्याची माहिती सूत्रांनी दिले. या वेळी सरपंच
लष्कराच्या छावणीमध्येच होते. अशा स्वरुपाच्या दुरध्वनीमुळे संशय आलेल्या
सरपंचाने दुरध्वनी करणाऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दुरध्वनी करणाऱ्याने यावर आपण उप आयुक्तालयामधून दुरध्वनी करत असल्याचे
सांगितले. तेव्हा अशी माहिती थेट भारतीय लष्करासच विचारणे योग्य होईल, असे
सरपंचांनी स्पष्ट केले. या सरपंचांचे नाव स्टॅन्झिन असे आहे. यानंतर उप
आयुक्त कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर येथून अशा स्वरुपाचा कोणताही
दुरध्वनी करण्यात आला नसल्याचे निष्पन्न झाले. सरपंचांना करण्यात आलेला
दुरध्वनी हा “कॉंप्युटर जनरेटेड कॉल‘ असल्याचेही नंतर आढळून आले. दुरध्वनी
करणाऱ्याने भारतीय लष्कराच्या हालचालींबद्दल आणि या भागात बांधण्यात
आलेल्या रस्त्यांविषयीही माहिती विचारल्याचे स्टॅन्झिन यांनी सांगितले.

या
प्रकरणानंतर करण्यात आलेल्या सविस्तर चौकशीमध्ये भारत-चीन सीमारेषेनजीक
राहणाऱ्या इतर गावकऱ्यांनाही अशा स्वरुपाचे दुरध्वनी करण्यात आल्याचे
उघडकीस आले. या पार्श्‍वभूमीवर येथील स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने
राबविण्यात येत असलेल्या प्रचार मोहिमेद्वारे पुन्हा अशा स्वरुपाचा
दुरध्वनी आल्यास कोणतीही माहिती न देता तत्काळ नजीकच्या भारतीय लष्करी
स्थानकास कळविण्याचे आवाहनही लष्कराने केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *