👁 6 Views

प्रेयसीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच प्रियकराची आत्महत्या…..

 फसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणीवर अभियंता असलेल्या तरुणाचा जीव जडला. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, तिच्या आईवडिलाने तिचे लग्न ठरवले. तिने आईवडिलांना विरोध न करता लग्न केले.


मात्र, तिच्यासाठी वेडापिसा झालेल्या प्रियकराने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी नवविवाहित प्रेयसीसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा युवा अभियंता असून तो कुहीत राहतो. तो कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याचे फेसबुकवरून जया (भंडारा) हिच्याशी मैत्री झाली. दोघांची काही दिवस फेसबुकवरून ‘चॅटिंग’ सुरू झाली. त्यानंतर एकमेकांचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचे सूत जुळले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


शुभम हा तिला भेटायला भंडाऱ्याला जायला लागला. तिच्यावर शुभमने जीव ओवाळून टाकला. जया आणि शुभमने लग्नाबाबत आपापल्या घरी विचारणा करण्याचे ठरवले. जयाने आपल्या आईवडिलांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी लगेच प्रेमविवाहास नकार दिला. त्यांनी शुभमबाबत विचारणा केली. त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि पत्ता घेतला. मुलीचे प्रेमसंबंध बघता तिच्या आईवडिलांनी जयाचे तडकाफडकी लग्न ठरवले. प्रेमविवाह करू नये म्हणून तिचे एका नातेवाईक युवकाशी लग्न लावून दिले. तसेच शुभमच्या घरी जाऊन त्याला पाच लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभम भीतीच्या सावटाखाली नैराश्यात गेला.

जयाच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारीला शुभमने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली. शुभमच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *