![]()
पंढरपूर (प्रतिनिधी):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे झाले. या प्रसंगी जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री विजय देशमुख, मंत्री सुभाष देशमुख यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करुन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सर्वश्री हणुमंत डोळस, रामहरी रुपनवर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख आदी उपस्थित होते.
सकाळी 10.45 वाजता माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने माऊलींच्या पालखीला निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह सातारा जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या पालखी सोहळ्यात धर्मपुरी येथे डाक बंगला मैदान पर्यंत पालकमंत्री विजय देशमुख, मंत्री सुभाष देशमुख, आमदार सर्वश्री हणुमंत डोळस, रामहरी रुपनवर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी खांद्यावर पताका व गळ्यात टाळ घेऊन दिंडी सोबत प्रवास केला.
पालखी आगमनापूर्वी पर्यावरण तसेच स्वच्छता विषयक दिंडी कार्यक्रमाबाबत शासनाच्या विविध विभागामार्फत वारकर्यांसाठी प्रबोधनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
या पालखी सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी-पदाधिकारी, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरित वारी – पर्यावरणाची वारी या संकल्पनेअंतर्गत पालकमंत्री विजय देशमुख व मंत्री सुभाष देशमुख यांनी पर्यावरणाचे महत्व जाणत पालखी मार्गावर वृक्षारोपण केले. झाडांची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिकांना केले.






