॥ नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कल्यांतीचे तुका म्हणे ॥

‘पंढरीची वारी आहे माझे घरी
अणिक न करी तिर्थव्रत
व्रत एकादशी करीन उपवाशी
गाईन अहर्निशी नाम मुखी
नाम विठोबाचे घेईन मी वाचे
बीज कल्यांतीचे तुका म्हणे’’
पंढरी नगरीत एकादशी पेक्षा मोठे कोणतेच व्रत नाही. पंढरीरायाची भक्ती ज्यांच्या अंत:करणात, घराण्यां मध्ये चालत आली आहे. त्याला ‘‘पंढरीची वारी’’ एकच व्रत आहे.त्याला दुसर्‍या कोणत्याच व्रताची आवश्यकता नाही. इतर देव,इतर उपाय,इतर व्रत वैकल्ये या सार्‍या गोष्टी गौण आहेत. ‘‘एक आम्ही धरिला चित्ती रखुमाईचा पती ’’ त्याला आपल्या अंत:करणात धरले की सारे कांही मिळते असा तुकोबारांना विश्‍वास होता. एकादशीच्या दिवशी अहर्निशा विविध प्रकारांनी भगवंताचे स्मरणच करायचे.एकादशी व्रतच आचरायचे अन्याची गरज नाही.
एकादशीचे व्रत कांही आज कालचे नाही.ते खूप जुने,सनातन आहे. एकादशीचा संबंध अन्नाशी नसून ब्रम्हाशी आहे. देवलोकातून प्रचलित झालेले हे व्रत महर्षि नारदांकडून मृत्युलोकात सर्वांना ज्ञान झाले. प्रथम नारदांनी शौनक ऋषीस हे व्रत सांगितले त्यांनी अन्य ऋषींना सांगत सांगत एकादशी व्रताचा भारतभर प्रचार झाला.जीवानात सुख, समाधान, शांती,आणि अंती मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत करतात.
एकादशी या विषयी,त्या व्रतासंबंधी खूप जणांच्या डोक्यांत वेगवेगळ्या कल्पना विलास असतो, अन्नात बदल म्हणजे एकादशी का?यांचे मर्म खूप जणांना आकलन होत नाही. पण एकादशी एक साधना आहे.ती एक सहज समाधी आहे.  एकादशी एक सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. एकादशीच्या दिवशीची भक्तांची मानसिकता त्याची वृत्ती म्हणजे एकादशी, एकादशी एक अवस्था आहे.आपल्या ध्येयांची,मनाची, चिंतनाची ती एक दिशा आहे.धी म्हणजे बुध्दी ज्याची बुध्दी सर्व ठिकाणी समान ती समाधी.
लोकसाहित्यातून देखील एकादशीच्या व्रताचा मानसिक धाक, संस्कार परंपरागत श्रध्दाळू मनाला, त्यांच्या दैनंदिन जीवनाला आहे आणि तो आग्रह भोळ्या भाबड्या अशिक्षित समाजात तर अधिक आहे.सासरी जाणार्‍या लेकीला आईने एकादशीची आडवण करणार्‍या ओव्या लोकसाहित्यात सापडतात.
‘साळु नांदाया जाते, तिच्या पदरात गुळशेंगा एकादशीचा नेम सांगा । नादान मैनेला ॥
पापपुण्याच्या संकल्पनेत पुण्याईचे संचीत करण्यासाठी यमाच्या धाकही एका ओवी मध्ये सापडतो.
स्वर्गाचे या वाटेवरी । यम करतो पुसापुशी ।
किती केली ग एकादशी। अज्ञानी बायानो ।
एकादशी व्रताच्या अशा अनेक समर्पक ओव्या वाचायला मिळतात. सर्वसंतांनी तर एकादशीचे महत्व अनन्यसाधारण सांगितले आहे. एकादशी महात्म्य अनेक ग्रंथपुराणातूनही सापडते. श्रीमद्भागवत ग्रंथामध्ये भक्त शिरोमणी राज अंबरीषाचे एकादशीचे व्रत सर्वश्रुत आहे.
एकादशी,तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टीळा,मुखी भगवंताचे नाम, हाती टाळवीणा हे सारे तर भगवंता इतकेच पुराण आहे. परब्रम्हा इतके जुने आहे. आपल्या जीवनात त्याचे अनन्य साधारण महत्व आहे. हे सारे नियम पाळणार्‍या सात्वीक कन्यापुत्रांचा देवालाही हर्ष वाटतो, अभिमान वाटतो असे तुकोबाराय म्हणतात
‘‘ नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
बीज कालयांतीचे तुका म्हणे ।
विठोबाचे नाम मुखाने घेणे हेच सोपे आणि तारक आहे. कारण अनेक कलपे येतील जातील पण हे बीज रूपाने राहणारे, संचित होणारे आहे म्हणून तर ते दर जन्मात पुण्याई च्या रूपाने उगवून येते व मानवाचे निरंतर कल्याण करते.माऊलीनी म्हणून तर या नामाचा आग्रह हरिपाठामध्ये पुन:पुन्हा धरला आहे.सर्वथैव अभिष्ट होण्या करिता व्रत नेमाची गरज आहे.एकादशी दर 15 दिवसाच्या 11 व्या दिवशी येते प्रतिपदेपासून नवमीपर्यत नवविद्या भक्तीच्या एकएक पायरीला सर करीत आपल्या मनाची अवस्था उन्नत करीत जायचे दशमीला आत्मनिवेदन आणि एकादशीला एकाकार अवस्था, आपल्यातील आणि देवातील अद्वैताच्या आनंदाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न, एकादशी आपल्याला एकाकार, अविछिन्नता,तादात्म्यता,तन्मयता एकरसता,एकांत भक्तीचा आनंद देते.
या आनंदासाठी खूप आणि सततचा अभ्यास,ध्यास आणि साधना हवी आहे. वारकरी लोक नेमाने पंढरीला येतात.एकादशीला भगवंताचे सानिध्य हवे म्हणून चंद्रभागेचे स्नान, पुंडलिकरायाचे दर्शन, प्रदक्षिणा,भजन, किर्तन, प्रवचन, हरिजागर असा सारा नामस्मरण सोहळा अनुभवतात त्यादिवशी दुध,चहा, ङ्गलाहार एवढाच करतात तो कशासाठी? तर आपण करीत असलेल्या उपासनेत, सेवेत रजोगुणी, तमोगुणी,आहारामुळे शारिरीक मानसिक अस्वस्थता निर्माण होईल. अडथळा निर्माण होईल, भगवंताचे नाम आणि अनुसंधान तुटेल असे काहीही वर्ज म्हणून जेणे करून तनमन हलके राहील. आपल्या इच्छित ध्येयात तन्मयता साधेल असेच एकादशीला स्विकारायचे म्हणून शिजवलेले अन्न, जेवण त्यादिवशी घ्यायचे नाही.एकादशी ही आपल्या उपासनेची सराव परीक्षा अथवा स्वाध्याय म्हटले तरी ते वावगे होणार नाही.
आपण जर नामी असू, उपासनेमध्ये असू तर एकादशीच्या दिवशी अर्थात एकुण जीवनामध्ये भगवंताशी सख्य साधणे,त्यांचे माझ्या अंत:करणात वास्तव्य आहे. त्याच्या पाशी माझा वास आहे हे सारे विश्‍व त्याच्यापासून आहे आणि विश्वी तो भरून राहिला आहे. मी सुध्दा त्याच्यासारखा व्यापून उरलो आहे हा सारा भाव अंत:करणात चित्रामध्ये सदैव चिंतला पाहिजे म्हणूनच माझे असणे ही भगवंताची लीला नव्हे का? ही जाणीव ह्दयामध्ये होवून जी निरहंकारी,निर्विकारी, निर्विचारी अवस्थेत भगवंताच्या नामाशी
तादातम्य होणे विविध प्रकारांनी त्या एकाच भगवंताशी समरस होणे ही मनाची वृत्तीची अवस्था,शरीराचे तप म्हणजे एकादशी अशी एकादशी आपल्या सारख्या सामान्यांना किती साधते?
काम,क्रोध,लोभ,द्वेष,मत्सर इर्षा या सार्‍याच गोष्टीची वृत्तीची दाहकता जिथे विझली असेल,सेवा हा एकच भाव जिथे उदयाला आला असेल तो दिवस एकादशीचा हे वृत्तीत मनात साकाराचे असेल तर देहासाठी सुध्दा दर्शनी अट्टाहास करण्याची गरज असतेच मनभगवे होण्यासाठी, विरक्त होण्यासाठी बाह्य उपचारांची गरज असतेच. एकादशी व्रत खरेच महान आहे.या दिवशी गोपीचंदनाचा टिळा,बुक्का,माळ धारण केलेली भक्तमंडळी दिसतात. बुक्का म्हणजे प्रपंचातील सर्व कामनेची राख आहे. वृंदावनातील गोपीची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या रोमारोमात कृष्णप्रेम भरले  होते. त्यांनी जेव्हा देह विसर्जन केला तेव्हा त्यांच्या देहाला दिलेल्या अग्नीतून चंदनाचा गंध येत होता. त्याची रक्षा झाली ते गोपीचंदन कृष्णप्रेमाची खूण आणि गोपीच्या भक्तीला शिरोधार्थ मानून वारकरी ते गोपीचंदन कपाळावर धारण करतात. तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे कारण तुळस भगवंताला आवडते म्हणून आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवणे. देवाला नैवेद्य दाखवताना त्यावर आपण तुळशीचे पान ठेवतो. मगच नैवेद्य दाखवतो. तसेच आपला देह नैवेद्य रूपाने देवाला समर्पित करायचा तर त्यावर तुळशीपत्र नको का ठेवायला म्हणून वारकरी लोक,विठ्ठलभक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात. कायमचीच माळ देहावर असते. कारण हा देह कायमच विठ्ठलाला समर्पित केलेला असतो. तो देवाशी देवभावाशी तादात्म एकरूप झालेला असतो.
एकादशी म्हणजे 10+1=11  म्हणजेच दशइंद्रिय आणि अकरावे मन दहाइंद्रियावर एका मनाने मिळवलेला विजय मनन, चिंतन नेमके जमण्यासाठी बाह्यकर्मे ही भगवंतासाठीच करायची. म्हणून देहिक आचरणाने मनाची शुध्दी आणि एकात्मता साधायला मदत होते.
सर्वसाधारणपणे आपण एकादशी करतो म्हणजे चला तेवढीच स्वयंपाकात सुट्टी म्हणून सकाळपासून स्वच्छतेची कामे आपण जादा उकरून काढतो. जाळ्या काढा, ङ्गरशा धुवा, मोर्‍या संडास धुवा, जादा कपडे धुवा, केस धुवा, एक ना दोन 12 वाजेपर्यत ङ्गालतू कामात वेळ घालवतो. मग ङ्गराळाचे प्रकार करतो. पोटभर खातो या सगळ्या घोळात नामस्मरण विसरून जातो. पण रजोगुण, तमोगुण, वाढवणारी कामे एकादशीच्या दिवशी आवर्जून करू नयेत. शक्यतो ती टाळावीत महिन्यातून ङ्गक्त 2 दिवस असणार्‍या या एकादशीच्या दिवशी तरी आपली भगवंताजवळ तादात्म्यता असावी. असे हे एकादशीचे चिंतन आपण स्मरणात ठेवण्याची गरज आहे.
तुकाराम महाराज म्हणूनच एकादशीचे व्रत आणि पंढरीची वारी एवढा एकच कुलधर्म माझ्या घरी आहे. आणि समस्त जीवाचे कल्याण करण्यासाठी ते एकच व्रत पुरेसे आहे असे सांगतात त्यादिवशी ङ्गक्त विठोबाचे नामस्मरण करण्याने या आणि पुढील जन्माचे कल्याण होणार यात शंकाच नाही.
‘‘ व्रत एकादशी करीन उपवाशी,
गाईन अहर्निशी मुखी नाम ’’
*****

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *