पंढरपूर येथे (वै.) सदगुरु भानुदास महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्यतिथी सोहळ्याचे प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन करताना प्रसाद महाराज अमळनेरकर, सुधाकर परिचारक, शंकर महाराज बडवे, गुरुबाबा औसेकर, भागवताचार्य वा.ना.उत्पात, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, उध्दव महाराज कुकुरमुंडेकर
पंढरपूर … ज्ञानेश्वरीचे गाढे तत्वचिंतक (वै.) धुंडा महाराज देगलूरकर यांचे पुत्र (वै.) सदगुरु भानुदास महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (वै.) सद्गुरु भानुदास महाराज देगलूरकर हे उत्तम प्रवचनकार, उत्तम किर्तनकार आणि उत्तम व्याख्याते होते. एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकीली न करता आपल्या घराण्याची परंपरा दृढ भावनेने शेवट पर्यंत सांभाळली. त्यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव 26 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात साजरा झाला. या निमित्ताने येथील संत गजानन महाराज मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागातून आलेले सुमारे पाच हजाराहून अधिक भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
(वै.) भानुदास महाराज यांच्या विषयीच्या ‘सकळा पढिये भानु‘ या स्मरणिकेचे आणि ‘ कैवल्यतेज‘ या देशातील तत्वचिंतकाच्या विविध विषयावरील लेखांच्या संग्रहाचे प्रकाशन प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख रामकृष्णदास महाराज लहवितकर, उध्दव महाराज कुकुरमुंडेकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, शंकर महाराज बडवे, भागवताचार्य वा.ना.उत्पात, बाळशास्त्री हरिदास, दादा महाराज शिरवळकर, वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी आमदार विलासराव लांडे, गुरु महाराज देगलूरकर, गुरुबाबा औसेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद महाराज जगताप यांनी केले.
सात दिवसातील या सोहळ्यात ज्ञानदाना बरोबरच अन्नदान ही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. महोत्सव काळात दररोज पहाटे काकडा भजन , विष्णुसहस्त्रनामपाठ, सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री तुकाराम महाराज गाथा प्रवचन, नामवंताची किर्तने,
प्रवचने झाली. पारायणात एक हजार वाचकांनी सहभाग घेतला. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या
सोहळ्याची सांगता झाली.

