दिवाळी नंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात फुटणार फटाके..! जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी 27 नोव्हेंबरला मतदान…. पंढरपूर, बार्शी नगरपालिकांकडे मतदारांचे विशेष लक्ष

सोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या  बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी आणि  दुधनी या नगरपालिकांसाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठीचा निवडणूक कार्यक्रम आज, राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठीची आचारसंहिताही तात्काळ लागू करण्यात आलीआहे.

दरम्यान, निवडणुकांच्या घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तसेच इच्छुकांनी निवडणूक लढण्याच्या दृष्ट्रीने तयारीला सुरूवात केली आहे.

राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठीदेखील संबंधित दिवशी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेच दुसर्‍या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, यात मुदत संपणार्‍या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती; तर  नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणीची आचारसंहिता संपुष्टात येईल.

*नामनिर्देशनपत्रांसाठी संगणक प्रणाली*

नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणुका होतील; तर नगरपंचायतींच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होतील. या निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहजरितीने भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठीच्या संकेतस्थळावरील नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रात आवश्यक ती सर्व माहिती भरून त्याची प्रत काढावी (प्रिंट आऊट) आणि त्यावर सही करून ते निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले.

*जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा*

राखीव प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मूभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

*पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील निवडणुका*

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका या चार टप्प्यात होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे. यात सोलापूर: 1) बार्शी, 2) पंढरपूर, 3) अक्कलकोट, 4) करमाळा, 5) कुर्डूवाडी, 6) सांगोला, 7) मंगळवेढा, 8) मैंदर्गी व 9) दुधनी या नगरपालिकांचा समावेश आहे.

*दुसर्‍या दिवशी मतमोजणी*

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठीची मतदान हे 27 नोव्हेंबरला होईल आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरला मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार आहे.

*सोलापूर जिल्ह्यात 9 नगरपालिकांसाठी मतदान*

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 9 नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये  बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी आणि  दुधनी या महत्वपूर्ण नगरपालिकांचा समावेश आहे. यातील पंढरपूर, बार्शी नगरपालिकांकडे मतदारांचे विशेष लक्ष असणार आहे.

*नगराध्यक्ष निवड थेट पध्दतीने…*

राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया ही थेट पध्दतीने निवडली जाणार आहे. यासाठीची आरक्षण रचना यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांनीही आता तयारीला सुरूवात केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *