52 कोटींच्या 8 रस्त्यांच्या कामाचे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरींग कॉलेजला देण्याची अर्थमंत्र्यांकडे मागणी

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी) : सध्या पंढरपूर शहरात राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीमधून 52 कोटी रूपयांची 8 कामे सुरू आहेत. त्यापैकी चार कामांना सुरूवात झाली आहे. उर्वरीत चार कामे लवकरच सुरू होतील. एकूणच शहरातील रस्त्यांची झालेली वाताहात (चाळण) पाहता नव्याने करण्यात येणारे 8 रस्ते हे उच्च प्रतिचे, दीर्घकाळ टिकणारे असावेत, यासाठी या रस्त्यांचे थर्ड इन्स्पेक्शन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज ऑफ पुणे अथवा मुंबई या शासनमान्य संस्थेकडे देण्याची मागणी भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शुक्रवारी पुणे येथे विधानभवनमध्ये भेटून लेखी निवेदनाद्वारे केली.
राज्य सरकार पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रूपये देत आहे. मात्र या कामांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने अधिकारी व ठेकेदार संगनमत करून सदरची कामे निकृष्ठ प्रतिची करत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. सध्या पंढरपूर शहरातील रस्त्यांची वाताहात (चाळण) झाली आहे. दुचाकी महिला, पुरूष वाहनधारकाला तसेच सायकल चालकाला आपले वाहन चालविताना खड्डे चुकवत चुकवत वाहन चालवावे लागत आहे. शहरातील बहुतांश रस्ते हे नुकत्याच झालेल्या    पावसाळ्यात खराब झालेले आहेत.
राज्य सरकारने पंढरपूरच्या विकासासाठी 52 कोटी रूपयांचे आठ रस्ते मंजूर केले आहेत. या रस्त्यांचा निधी शासनाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत पालिकेकडे वर्ग केला आहे. 
सध्या पंढरपूर शहरात गुरांच्या दवाखान्याजवळील, पद्मावती उद्यानाजवळील, कैकाडी महाराज मठाजवळील व रेल्वे स्टेशन समोरील न्यायाधीशांच्या घरासमोरील चार रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत. या कामांची थोडीफार खोदाई व या रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टार्म वॉटर ड्रेनसाठी मोठमोठ्या पाईपा टाकल्याचे दिसून येत आहे. सदरचे काम हे सुमारे 10 ते 15 टक्के झाले असताना पालिकेने या कामाच्या ठेकेदाराचे चार कोटी 40 लाख रूपयांचे बिल अदा केले गेले आहे. अशाच पद्धतीने ही कामे केली गेल्यास सदरचा ठेकेदार हा पालिकेतील अधिकार्‍यांना हाताशी धरून आपली बिले अ‍ॅडव्हान्स रूपाने काढून घेईल, अशी भिती निर्माण झाली आहे. याकडे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे. सदरच्या कामाचा दर्जा हा उत्तम प्रतिचा रहावा, ही कामे दीर्घकाळ टिकावीत, याकरीता या कामाचे थर्ड इन्स्पेक्शन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज ऑफ पुणे  अथवा मुंबई या शासनमान्य संस्थेकडे दिले जावे, अशा आशयाची मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शुक्रवारी पुणे येथील विधानभवनात भेटून भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर, चिटणीस शंतनु दंडवते, हर्षद गायकवाड यांनी केली आहे. 
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *