![]()
पंढरपूर, दि. 4 – सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शुक्रवार (3 मार्च) रात्री पाणी सोडण्यात आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास १६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी दिली.
सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, शिरभावी पाणीपुरवठा योजना, कासेगाव पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी एकूण ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनांसाठी बंधारे आहेत, अशा ठिकाणी हे पाणी साठवण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर औज बंधारा, पंढरपूर बंधारा, मंगळवेढ्यातील बंधा-याचा समावेश आहे. हे बंधारे या पाण्यातून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. भीमा नदीवरील इतर १७ बंधारेही शेतीच्या पाण्यासाठी भरून घेण्याची मागणी होत आहे.

