👁 7 Views

सोलापूर: गोव्याच्या अवैध मद्यातून जिल्ह्यात बक्कळ पैसा

 

सोलापूर : राजकारणासाठी पैसा लागतोच आणि तो जमविण्यासाठी अनेकजण अवैध मार्गाचा अवलंब करतात. काही राजकीय कार्यकर्ते व पुढाऱ्यांचे हॉटेल-ढाबे आहेत. शहर-जिल्ह्यातील बहुतेक हॉटेल व ढाब्यांवर वाईनशॉपमधील दराच्या तुलनेत गोवा बनावटीची दारू निम्म्या किंमतीत मिळते.


स्थानिक पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या तुलनेत गोवा बनावटीचीच दारू अधिक प्रमाणात सापडली आहे.


विशेषत्वे, जिल्ह्याच्या अर्थकारणाला गोव्याचा मद्याचा जणू काही अंशी हातभार लागत असल्याचे चित्र असून ‘खादी’वाल्यांना गोवा बनावटीचा चांगलाच ‘गोडवा’ लागला आहे. ‘उँचे लोग…उँची पसंत… त्याप्रमाणे उँचे लोग… उँची गोवा पसंत…’ असे समीकरण याबाबतीत झाले आहे.

हातावरील पोट असलेल्यांना पार्टी दिली की आपल्यालाच मतदान पडेल, असा विश्वास काहींना वाटतो. ‘इलेक्शन म्हटले की पैसा खर्च करणे’ असेच समीकरण मानले जाते. निवडणूक जेवढी मोठी-प्रतिष्ठेची तेवढाच खर्च देखील करावा लागतो. राजकीय पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांभाळावेच लागते.


त्यामुळे पैसा कमविण्याच्या हेतूने अनेकजण अवैध व्यवसाय सुरु करतात. त्यात हॉटेल, ढाब्याच्या आडून अवैधरीत्या दारू विक्री असेही प्रकार आहेत. वाइन शॉपमधील दारू खूपच महागडी असते. त्यामुळे स्वस्तात मिळणारी गोवा बनावटीची दारू चोरीच्या मार्गाने आणून विक्री करण्याचे प्रकार होतात. दरम्यान, मागील दीड वर्षांत सोलापूर जिल्ह्यात जवळपास १२०० कोटी रुपयांची दारू विक्री झाली आहे.

तर अवैधरीत्या दारू विक्री देखील मोठ्या प्रमाणावर आहे. दहा महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने साडेपाच कोटींची अवैध दारू जप्त केली आहे. त्यातील अनेक कारवाईत काही राजकीय पुढाऱ्यांनी देखील हस्तक्षेप केल्याचा अनुभव वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *