चैत्री यात्रा कालावधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-प्रांताधिकारी संजय तेली
पंढरपूर दि.29:- चैत्री यात्रा कालावधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना नेमून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडावीत असे आवाहन प्रांतधिकारी संजय तेली यांनी केले.
चैत्री यात्रा 2017 नियोजन संदर्भात शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तहसिलदार अमित माळी, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे,मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चैत्री यात्रेत नगरपालिकेने शहर स्वच्छता, गटारे साफ सफाई तातडीने सुरु करावी. वाहनतळ, औषध फवारणी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, पाणी नमुने तपासणी, अग्निशमन व्यवस्था, यात्रा काळात स्वच्छ व शुध्द पाण्याचा पुरवठा करावा. तसेच 65 एकर व वाळवंटात स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी अशा सुचना प्रांताधिकारी तेली यांनी बैठकीत दिल्या.
उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन ठेवावा. उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांचे पथक व अँम्बुलन्सची व्यवस्था करावी. अन्न व औषध विभागाने हॉटेल, फेरीवाले, मठ व अन्य ठिकाणच्या प्रसाद वाटप केंद्रात भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्युत वितरण विभागाने यात्रा काळात शहरात वीज पुरवठा अखंडीत राहील याची दक्षता घ्यावी. एस टी महामंडाळाने बसस्थानकावर भाविकांसाठी स्वच्छ व शुध्द पाण्याची व्यवस्था करावी तसेच बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवावा. मंदिर समितीने भाविकांसाठी दर्शन रांगेत व दर्शन मंडपात सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच मंदीर परिसरात भाविकांचे उन्हापासूण संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी.
या बरोबरच सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार, तहसिल, भीमा पाटंबधारे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी या विभागाचाही बैठीकीत प्रांताधिकारी तेली यांनी आढावा घेऊन संबंधिताना सूचना दिल्या.
00000
