एक मंत्री दुसऱ्याला शिफारस करतो, ‘हे कसले सरकार ? – खडसे यांचा सरकारला घरचा आहेर # शालेय पोषण आहार घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा

एक मंत्री दुसऱ्याला शिफारस करतो, ‘हे कसले सरकार ? – खडसे यांचा सरकारला घरचा आहेर
# शालेय पोषण आहार घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शालेय पोषण आहार वितरण घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारस एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याकडे करतो, या प्रकाराबद्दल विधानसभेत जाहीर नाराजी प्रकट करतानाच ” हे कसले सरकार ? अशा संतप्त शब्दात टीकेची झोड उठवून राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला घरचा आहेर दिला.

राज्यातील शालेय पोषण आहाराच्या साहित्य वितरणात घोटाळा झाल्याचा मुद्दा शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. शालेय पोषण आहाराच्या साहित्य वितरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व राज्य कंझुमर फेडरेशनमार्फत केले जात असून या वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आबिटकर यांनी केला. पॊषण आहाराचे काम ठराविक कंत्राटदाराला देण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी किचकट नियम व अटी तयार केल्या आहेत. लहान ठेकेदारांना निविदा स्पर्धेतून बाद करण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हा प्रकार केला असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आबिटकर यांनी केली. त्यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शालेय पोषण आहार वितरणातील अनियमिततेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे उत्तर दिले. तावडे यांच्या या उत्तरावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी असमाधान व्यक्त केले. घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याकडे शिफारस करतो, ” हे कसलं सरकार” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तावडे यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही मंत्री आहात, मग शिफारस कशी करताय. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांकडे शिफारस करू म्हणतो हे चुकीचे आहे. शिफारस करण्यापेक्षा तुम्ही एसआयटी चौकशीची घोषणा करा,अशी मागणी खडसे यांनी यावेळी केली. शालेय पोषण आहार साहित्य पुरवण्यासाठी ठराविक ठेकदारांनाच काम कसे मिळते, तेच तेच ठेकेदार भाग्यवान कसे ठरतात,असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठेकेदार मुलांच्या जिवाशी खेळत असून याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही खडसे यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *