पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राज्यभरातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम – गिरीष महाजन

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान
राज्यभरातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून
पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम  गिरीष महाजन
 मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समिती स्थापन
 नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश
 विविध वीस आजारासंबंधीची तपासणी होणार
 तपासणीनंतर गरजूंना मोफत उपचार करण्यात येणार
मुंबई, दि. 19 : राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात येत्या 1 ते 27 मे 2017 दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिल्या.
            पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवारआयुषचे संचालक श्री. कोहली, सर ज.जी. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. आरोग्य पूर्व तपासणीमुळे रुग्णांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या उपलब्ध योजनांमार्फत त्या रुग्णांना योग्य ते पुढील उपचार, शस्त्रक्रिया संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येतील. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील एक असे सहा जिल्हे घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.     
पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग आदी वीस  विषयांतील आजारांसंदर्भातील पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम राबविण्यासाठी राज्य स्तरावर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री सहअध्यक्ष आहेत. तर जिल्हास्तरावर पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करावी, असे यावेळी श्री. महाजन यांनी सांगितले.
श्री. महाजन म्हणाले की, या अभियानांतर्गत संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये या मोहिमेत सहभागी होणार आहेत.  या मोहिमेत सहभागी रुग्णांची विषयक माहिती ऑनलाईन ठेवण्यात यावी. तसेच तपासणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र रुग्ण सहायता कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांना सध्याच्या योजनांमधून लाभ मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच उपचारासाठी मदत मिळण्यासाठीही सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संस्था, अशासकीय संस्था व सामुदायिक सामाजिक दायित्व यांची मदत घेण्यात येणार आहे.
आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून शासन स्तरावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे नियोजन राज्यस्तरीय समिती करणार आहे. या मोहिमेच्या आधारावरच राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री श्री. सवरा म्हणाले कीसमाजातील तळागाळातील गरजू रुग्णांना या मोहिमेद्वारे आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केल्यास नक्कीच अभियान यशस्वी होईल.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील  यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा व वैद्यकीय शिक्षण विभागातील तज्ज्ञ मनुष्यबळाचा उपयोग करून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *