चंद्रपूर, लातूर, परभणीत कोणाची सत्ता? वरील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी..

चंद्रपूर, लातूर, परभणीत कोणाची सत्ता?
वरील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी..

21 Apr. 2017
लातूर : चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय.
तिन्ही महापालिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या 1 हजार 285 उमेदवारांचं भवितव्याचा आज निकाल लागणार आहे.
उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57 टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी 70 टक्के, तर लातूर महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झालं.
या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लातूर महापालिकेचा गड काँग्रेस राखणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर चंद्रपूर महापालिकेची सत्ता मिळ्वण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरांची प्रतिष्ठा पणाला लागली.
लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70
 
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
काँग्रेस – 49
शिवसेना – 06
रिपाइं – 02
परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65
राष्ट्रवादी काँग्रेस – 30
काँग्रेस – 23
शिवसेना – 8
भाजप – 2
अपक्ष – 2
चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66
काँग्रेस – 26
भाजप – 18
शिवसेना – 5
राष्ट्रवादी – 4
मनसे – 1
बीएसपी – 1
अपक्ष – 10
भारिप बहुजन महासंघ – 1
तिन्ही महापालिकेत एकूण 125 उमेदवार कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. तर 64 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे, 1 हजार 284 उमेदवारांपैकी एकूण 806 उमेदवार अल्पशिक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने 44, काँग्रेसने 31, राष्ट्रवादी काँग्रेसने 19, शिवसेनेने 15 कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण 50 लाखांच्या संपत्तीचा मालक आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये 64 उमेदवारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.  यातील सर्वाधिक गुन्हे हे लातूरच्या वार्ड क्रमांक 7 मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिट्टेवर यांच्याविरोधात आहेत. चिट्टेवर यांच्याविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारांना तिकीट वाटपात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कारण, काँग्रेसचे 24, भाजपचे 18, शिवसेनेचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई, पुण्यासह दहा महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. त्यामुळे चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *