नागपूर : शेजारी राहणाऱ्या दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली. त्याने घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत भाचीला घरात ओढून शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी मामावर गुन्हा दाखल केला असून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात. तिला लहान बहीण आणि भाऊ आहे. तिच्या शेजारी आरोपी द्वारकेश (३५) नावाचा मामा राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची भाचीवर वाईट नजर होती.
तो तिच्या घरी जाऊन तिचा लाड करण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे करीत होती. तिने सुरवातीला मामा असल्यामुळे दुर्लक्ष केले. तिचे आईवडील घरी नसताना तो वारंवार घरी यायला लागला. त्याने तिला भेटवस्तू, चिप्स किंवा चॉकलेट देऊन जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले.
२० फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजात तिचे आई-वडील घरी नव्हते. ती एकटी घरी असल्याचे बघून मामाने तिचे घर गाठले. आतमध्ये गेल्यावर त्याने तिला कवेत पकडले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली.
मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी बळजबरी करीत अश्लील चाळे केले. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. चार दिवसांनंतर मामाने तोच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने आईला मामाच्या अश्लील कृत्याबाबत कल्पना दिली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.



